विचारधारेत भेद असला, तरी ‘किमान समान कार्यक्रमा’वर काम करू ! – संजय राऊत

महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राला शब्द दिला तो पाळायची परंपरा आहे. रामाची आरती करतो, त्याचा विचार असला पाहिजे. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे सोपे नाही.

सत्ता स्थापनेचा ‘फॉर्म्युला’ निश्‍चित झाल्यानंतरच पुढे जाण्याची आघाडीची भूमिका ! – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी शरद पवार यांना दूरभाष केला होता. या वेळी शरद पवार यांनी घाई करून चालणार नाही. समान कार्यक्रम आणि सत्तेचा ‘फॉर्म्युला’ निश्‍चित झाल्याविना पुढे जाणे योग्य ठरणार नाही, असा सल्ला दिला.

शिवसेना जनादेशाचा आदर करत नसेल, तर विरोधी पक्ष म्हणून कर्तव्य पार पाडू ! – रावसाहेब दानवे, भाजप

निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अन्य पर्याय असल्याचे म्हटले होते. निवडणुकीत भाजप-शिवसेना या दोघांना जनादेश मिळाला आहे. शिवसेनेने याचा आदर करायला हवा.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू !

भाजप, तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना राज्यपालानी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करूनही ते सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने १२ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात तिसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आहे.

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्यामुळे शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी वेळ वाढवून न दिल्याविषयी शिवसेनेने १२ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.  शिवसेनेच्या याचिकेवर न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज (१३ नोव्हेंबरला) सुनावणी करणार आहे.

लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल ! – नारायण राणे

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक आहे, ते मी करीन. त्यासाठी भाजपला सर्वतोपरी मी साहाय्य करीन.

राजकीय स्थितीवर भाजप लक्ष ठेवून आहे ! – सुधीर मुनगंटीवार

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाजप लक्ष ठेवून आहे, असे भाजपच्या कोअर कमिटीत ठरल्याचे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले….

महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अधांतरी !

महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे सावट,
शिवसेनेला राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ देण्यास नकार !
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून शिवसेनेला समर्थनाचे पत्र नाहीच !

काँग्रेसने शिवसेनेला ५ वर्षे कायम समर्थन दिले, तर लोकांचा तिच्यावर विश्‍वास बसेल ! – माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा

जर काँग्रेसने शिवसेनेला समर्थन दिले, तर त्यांनी ५ वर्षे पाठिंबा कायम ठेवला पाहिजे. त्यानंतर लोकांचा काँग्रेसवर विश्‍वास बसेल, असे मत माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेना समवेत नसल्याने आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला नव्याने सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले होते; मात्र शिवसेनेला आमच्यासोबत यायचे नाही. जनादेश एकत्र काम करण्यासाठी होता. शिवसेनेला जनादेशाचा अपमान करून सरकार स्थापन करायचे असेल, तर त्यांना शुभेच्छा ! आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही.