25th Anniversary Sanatan Prabhat : ‘सनातन प्रभात’च्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीपर्यंत लढा चालू राहील !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात वाचक-धर्मप्रेमी यांचा निर्धार !

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) : हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघातांना वाचा फोडणार्‍या, धर्मशिक्षण देऊन हिंदूंना संघटित करणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पत्रकारितेचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभले आहे. या व्रतस्थ पत्रकारितेची ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची ध्येयपूर्ती होईपर्यंत ‘सनातन प्रभात’च्या मार्गदर्शनाखाली लढा चालू ठेवू, असा निर्धार दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी केला.

सनातन प्रभात चे प्रकाशन करतांना सौ रूपाली वर्तक, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री प्रीतम नाचणकर

२२ मार्च या दिवशी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या व्रतस्थ पत्रकारितेचा कृतज्ञता सोहळा सद्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडला. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ज्येष्ठ उपसंपादिका सौ. रूपाली अभय वर्तक यांनी सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती सोहळ्याला लाभली.

सोहळ्यास उपस्थित मान्यवर, वाचक, साधक आणि धर्मप्रेमी

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, अधिवक्ता, पत्रकार, उद्योजक, डॉक्टर आदी विविध क्षेत्रांतील वाचक, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी, ‘सनातन प्रभात’शी जोडलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ आणि धार्मिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. नियमितपणे ‘सनातन प्रभात’ची आत्मीयतेने वाट पहाणारा हा सर्व वाचकवर्ग या वृत्तपत्राच्या २५ वर्षांच्या कृतज्ञता सोहळ्याचा साक्षीदार ठरला.

असा झाला सोहळा !

श्री गणेशाच्या श्लोकाने या कृतज्ञता सोहळ्याला प्रारंभ झाला. पुरोहित श्री. ठोंबरेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. संत आणि मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दिलेल्या शुभसंदेशाचे वाचन दैनिक ‘सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर श्री. प्रीतम नाचणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातनच्या साधिका सौ. भक्ती गैलाड यांनी केले.

वाचकांचे मनोगत !

प्रा. विठ्ठल सोनटक्के, कीर्ती महाविद्यालय

प्रा. विठ्ठल सोनटक्के, कीर्ती महाविद्यालय

दैनिक सनातन प्रभातमधून केली जाणारी हिंदूंची एकजूट आवडली. परात्पर गुरुदेवांचे लेख आध्यात्मिक आणि पारमार्थिकदृष्ट्या बळकटी देणारे असतात. मी माझ्या परीने या कार्यात खारीचा वाटा उचलत आहे. सनातन प्रभातच हिंदु धर्म वाचवू शकतो, याची निश्चिती झाली.

प्रा. श्रीपाद सामंत, मिठीबाई महाविद्यालय

प्रा. श्रीपाद सामंत

गेली २५ वर्षे निरंतर चालू असलेले दैनिक सनातन प्रभात हिंदूंसाठी मोठा आधार आहे. सनातन प्रभातचा वाचक हा साधक होतो, हे दैनिकाचे सामर्थ्य आहे. हे हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहे. ते साधकांना मोक्षापर्यंत नेणारे मोक्षयान आहे.


‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे. गेल्या २५ वर्षांत ‘सनातन प्रभात’ने जे पाहिले, ते जगाला पहायला वेळ लागला. ‘हिंदु राष्ट्रा’सारखा विषय ‘सनातन प्रभात’ने आधीच हाताळलेला होता; पण जग आज हिंदु राष्ट्राविषयी सांगत आहे. मालेगाव बाँबस्फोटामागील सत्य हा विषयही ‘सनातन प्रभात’नेच प्रथम मांडला. न्याययंत्रणा कशी भ्रष्ट आहे, पत्रकारांमधील बाजारूपणा, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमागील वास्तव हे विषयही सनातन प्रभातनेच मांडले आहे. काळाच्या पुढे जाऊन सूत्रे मांडण्यात ‘सनातन प्रभात’ अग्रेसर आहे. ‘सनातन प्रभात’ नेहमीच एक पाऊल पुढे आहे. ते म्हणाले की,

१. दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे एक विद्यापीठ आहे. ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी क्षमता विकसित केली आहे.

२. आज राजकीय नेत्यांनाही ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांविषयी आदर आहे. सर्वपक्षीय नेते ‘सनातन प्रभात’च्या पत्रकारांशी मोकळेपणाने बोलतात.

३. दैनिकातून गुरूंचे विचार व्यक्त होतात. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून गुरुतत्त्वाची अभिव्यक्ती होत आहे.

४. ‘सनातन प्रभात’ची भाषा मृदू आणि सात्त्विक आहे. त्यात कोणताही व्यापार नाही.

५. ‘सनातन प्रभात’ वाचतांना जरी एखादे सूत्र समजले नाही, तरी काळानंतर तीच अनुभूती आपल्याला येते. हेच दैवी नियोजन आहे. आपण भाग्यवान आहोत की, आपण ‘सनातन प्रभात’ वाचतो.


वर्धापनदिन सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

हिंदु राष्ट्र निर्मितीच्या इतिहासात ‘सनातन प्रभात’चे नाव सुवर्णाक्षराने  लिहिले जाईल ! – सौ. रूपाली अभय वर्तक, ज्येष्ठ उपसंपादिका, सनातन प्रभात

सौ. रूपाली अभय वर्तक

सामाजिक माध्यमे, मुद्रित आणि डिजिटल अशा सर्व माध्यमांत पाय रोवलेल्या ‘सनातन प्रभात’ची वृत्ते ८ लाखांहून अधिक जण वाचतात. प्रचलित माध्यमक्षेत्रात कुठेही न आढळणारी अनेक वैशिष्ट्ये तत्त्वनिष्ठपणे जपत ‘सनातन प्रभात’ने आतापर्यंत अनेक राष्ट्र-धर्म विषयक दृष्टीकोन बीजरूपाने रुजवले आणि नंतरच्या काळात त्याचे चळवळी आणि आंदोलने यांच्या स्वरूपात परिवर्तन झाले. अतिशय परखड आणि निर्भीडपणे योग्य ते दृष्टीकोन देऊन ‘सनातन प्रभात’ सध्याच्या ‘डीप स्टेट’चे (डीप स्टेट म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात) षड्यंत्र ध्वस्त करत आहे. वाचकांची समष्टी साधना करवून घेणार्‍या आणि त्यांना हिंदु इकोसिस्टमचा (हिंदूंच्या सामाजिक व्यवस्थेचा) भाग करून घेणार्‍या ‘सनातन प्रभात’चे नाव हिंदु राष्ट्र निर्मितीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल, यात शंकाच नाही.


वितरकांप्रती कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता !

श्री. संजय उतेकर यांचा सत्कार करतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर (डावीकडे )

दैनिक ‘सनातन प्रभात’द्वारे हिंदु धर्मजागृती आणि हिंदू संघटनाच्या या कार्यामागे वितरकांचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. २५ वर्षांची ही घोडदौड वितरकांविना अशक्य होती. ३६५ दिवस वर्षानुवर्षे सेवाभावी वृत्तीने वाचकांपर्यंत अंक पोचवणारे वितरक म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’चा कणा आहे. अशा वितरकांचा सत्कार करून या वेळी ‘सनातन प्रभात’कडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नवी मुंबई येथील श्री. संजय उतेकर मागील ८ वर्षांपासून त्यांच्या खासगी आस्थापनाच्या माध्यमातून दैनिक गठ्ठे बांधणे आणि ते मुंबई , ठाणे, नवी मुंबई आणि रायगड येथे पोचवण्याची सेवा अल्पदरात करून या कार्यात सहकार्य  करत आहेत. यासह सर्वश्री विजय भोर, अमेय हडकर, संदीप शिंगाडे आणि अनिकेत मोरे हे मागील अनेक वर्षांपासून  दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण सेवा म्हणून करत आहेत. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर आणि धर्मप्रेमी 

ठाणे येथील ‘ईसीओ नाईट प्रोसेसर’ आस्थापनाचे मालक श्री. प्रभाकर कुलकर्णी , अधिवक्त्या लक्ष्मीताई कनोजिया, अधिवक्ता सुरभी सावंत, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड, अधिवक्ता मयूर कांबळे, अधिवक्ता अमित पांडे, हिंदुत्वनिष्ठ आणि चित्रपट निर्माती , अभिनेत्री अर्चना नेवरेकर, वरळी भाजप विधानसभा अध्यक्ष श्री. नीलेश मानकर, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ग्रंथ लिहिणारे श्री. शंकर कावळे, अधिवक्ता राहुल पाटकर


हिंदुत्वनिष्ठ संघटना

वज्रदल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, मानव सेवा प्रतिष्ठान, रायगड संवर्धन प्रतिष्ठान

सद्गुरु आणि संत यांचा सन्मान ! 

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा सन्मान सत्संगातील जिज्ञासू सौ. वनिता मांगले यांनी केला, तर पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सन्मान माहीम भाजप विधानसभा प्रभागाच्या अध्यक्षा सौ. रंजना वैती यांनी केला.


मान्यवर वक्त्यांचा सत्कार !

हिंदुत्वासाठी अखंड न्यायालयीन लढा देणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सत्कार दादर येथे प्रसिद्ध पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर, गोल देऊळचे विश्वस्त आणि अध्यक्ष श्री. अजित पेंडुरकर यांनी केला. श्री. पेंडुरकर यांचा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून बैठका घेणे, निवेदने देणे यांत कृतीशील सहभाग असतो.

सनातन प्रभातचे नवी मुंबई येथील वितरक श्री विजय भोर यांचा सत्कार करताना अधिवक्ता संजीव पुनाळेकर

सनातन प्रभातचे भांडुप, मुंबई येथील वितरक श्री अमेय हडकर यांचा सत्कार करताना अधिवक्ता संजीव पुनाळेकर

सनातन प्रभातचे परळ, मुंबई येथील वितरक श्री संदीप शिंगाडे यांचा सत्कार करताना अधिवक्ता संजीव पुनाळेकर

सनातन प्रभातचे नागोठणे, रायगड येथील वितरक श्री अनिकेत मोरे यांचा सत्कार करताना अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘सनातन प्रभात’च्या ज्येष्ठ उपसंपादिका सौ. रूपाली वर्तक यांचा सत्कार मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुरभी सावंत यांनी केले. अधिवक्त्या सुरभी सावंत यांनी ‘छावा’ या चित्रपटात ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे’, ही श्रींची इच्छा’ हे वाक्य असावे, हा आग्रह धरून त्यांनी निर्मात्याला तसे करण्यास भाग पाडले होते. समितीच्या कार्यात त्यांचा कृतीशील सहभाग असतो.


वेदमूर्ती सत्कार ! 

वेदमूर्ती श्री. ठोंबरे गुरुजी यांचा सत्कार हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. सुभाष अहिर यांनी केला.


क्षणचित्रे 

१. दैनिक सनातन प्रभातचे कृतीशील पत्रकार श्री. प्रीतम नाचणकर यांचा सत्कार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केला.

२. व्रतस्थ धर्मरक्षक असणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’चे मनोगत भावपूर्ण शब्दांत व्यक्त करणारा व्हिडिओ या वेळी दाखवण्यात आला.

३. कार्यक्रमस्थळी सनातन प्रभातची माहिती दर्शवणारे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन लावण्यात आले होते.


२५ वर्षांच्या समाजाभिमुख पत्रकारितेचा आलेख !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संकल्पनेतून वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ आरंभण्यात आले. तेव्हापासून देवतांच्या विटंबनेच्या विरोधात आवाज उठवणे, राष्ट्रध्वजाच्या अवमानाविषयी जनजागृती, हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणे, लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र, धर्मांतर आदी हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडणे, मंदिर सरकारीकरण, कथित अंधश्रद्धा निर्मूलन कायदा यांविषयी जागृती, प्रशासनामधील अपप्रकार उघड करणे आदी विविध क्षेत्रांतील ‘सनातन प्रभात’च्या सडेतोड पत्रकारितेचा कार्यक्रमस्थळी साकारण्यात आलेला आलेख लक्षवेधी ठरला. ‘सनातन प्रभात’ने केलेल्या समाजाभिमूख पत्रकारितेची व्यापकता यातून प्रदर्शित झाली.


डिजिटल ‘सनातन प्रभात’ला वाचकांच्या ‘बाईट’ !

‘सनातन प्रभात’च्या डिजिटल माध्यमावरील वृत्तांकन पहाणार्‍या दर्शकांनी या सोहळ्याच्या ठिकाणी स्वत:च्या ‘सनातन प्रभात’विषयीच्या भावना डिजिटल माध्यमापुढे व्यक्त केल्या. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी या वेळी वाचकांच्या बाईट (मत) घेतल्या.