हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
कोल्हापूर : येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा अपूर्ण आणि एकेरी उल्लेख असल्याने अनेक वर्षांपासून शिवभक्त अन् हिंदु संघटना यांद्वारे संताप व्यक्त होत आहे. काही शहरे, रेल्वेस्थानक, विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांची नावे नंतर आदरयुक्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापिठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे आदरयुक्त स्वरूपात करण्याची आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे २० फेब्रुवारीला आंदोलनाद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, विश्व हिंदु परिषद, हिंदु महासभा, हिंदु एकता आंदोलन, पतित पावन संघटना, बाल हनुमान तरुण मंडळ यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तरुण मंडळे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे तेजोमय प्रतीक आहे. त्यांच्या नावाचा अपूर्ण अथवा एकेरी उल्लेख करणे, हा त्यांच्या कार्याचा अवमान आहे. वर्ष १९६२ मध्ये घेतलेला निर्णय अंतिम असू शकत नाही. ६० वर्षांपूर्वीची कारणे आजही ग्राह्य धरता येणार नाहीत. समाजातील जनभावना, ऐतिहासिक महत्त्व आणि शासनाच्या आताच्या निर्णयांची दिशा लक्षात घेऊन हा पालट आवश्यक आहे. यापूर्वी अनेक ऐतिहासिक संस्थांची नावे सुधारली गेली आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा पालट न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडू.
शिवाजी विद्यापीठाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे व्हावे, छत्रपतींचा एकेरी उल्लेख होऊ नये, या मागणीसाठी….
✊🏻🚩हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन🚩✊🏻
🗓️वार, दिनांक: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५
🕔वेळ: सायं. ५ वाजता
⛳स्थळ:* छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर… pic.twitter.com/crArMHJHSl
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) February 20, 2025
वर्ष १९९६ मध्ये ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले. वर्ष २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला. ‘औरंगाबाद’ चे ‘संभाजीनगर’ नाव न ठेवता ते ‘छत्रपती संभाजीनगर’, अशी नावे पालटण्यात आली आहेत. याच धर्तीवर शिवाजी विद्यापीठाचे नावही ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करणे आवश्यक आहे. याला कुणी विरोध करणे धक्कादायक आहे. यामुळे दुर्दैवाने शिवाजी विद्यापीठ हा पुरोगाम्यांचा अड्डा झालाय का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –
|
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, २०१६ अन्वये राज्यशासनास विद्यापिठाच्या नावात पालट करण्याचा अधिकार असून, शैक्षणिक संस्थांनी ऐतिहासिक वारसा जपण्याचे दायित्वही आहे. सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १०५० नुसार सार्वजनिक संस्थांच्या नावांमध्ये ऐतिहासिक व्यक्तीमत्त्वांचा उचित उल्लेख असावा. भारतातील इतर विद्यापिठांची नावे संपूर्ण आहेत, जसे की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’, ‘सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ’. याच न्यायाने ‘शिवाजी विद्यापीठ’ऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे संपूर्ण आणि आदरयुक्त नाव असावे. छत्रपती ही पदवी म्हणजे केवळ राजा नव्हे, तर हिंदवी स्वराज्य संस्थापक, लोककल्याणकारी शासक आणि स्वराज्याचे संरक्षक यांचे प्रतीक आहे. त्यांच्या नावाचा संपूर्ण उल्लेख हवा. ऐतिहासिक अन् कायदेशीर दृष्टीकोनातून हे नामकरण त्वरित करावे. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव संमत करून विद्यापिठाच्या नावातील सुधारणेचा निर्णय घ्यावा आणि सर्व शासकीय दस्तऐवज, प्रमाणपत्रांमध्ये त्वरित पालट करावा.’’
हिंदूंनी त्यांची श्रद्धास्थाने, अस्मिता, महापुरुष यांचा अवमान सहन करू नये ! – प.पू. कालिचरण महाराज

हिंदूंनी त्यांची श्रद्धास्थाने, अस्मिता, महापुरुष यांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन करता कामा नये. अशा अवमानांच्या विरोधात एकत्रित येऊन विरोध केला पाहिजे, यासाठी प्रसंगी आंदोलनही केले पाहिजे. हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने चाललेल्या या आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हिंदूंनी प्रयत्नशील राहून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
‘‘ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव प्रत्येक जण आदराने घेतो, त्या छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करून ‘शिवाजी कोण होता ?’, असे कॉ. पानसरे यांचे पुस्तक कसे काय विक्री होते ? त्यामुळे ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे नाव त्वरित पालटावे, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत.’’ – श्री. सुनील घनवट |
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद पाटील, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. शरद माळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘श्री’ संप्रदायाचे श्री. उमेश नरके, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. युवराज शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री. सुशील भांदिगरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील, हिंदु महासेभेचे श्री. विकास जाधव, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके सर्वश्री सतीश पाटील, दीपक यादव, अर्जुन आंबी यांसह अन्य उपस्थित होते. या वेळी २०० हून अधिक शिवप्रेमींची उपस्थिती होती. |