पक्ष मोठा करायचा असेल, तर कार्यकर्त्यांना बळ द्या !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले


रत्नागिरी – कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी खासदार नारायण राणे आणि माजी आमदार रामदास कदम यांनी त्या काळात खूप काम केले. उद्धव ठाकरे यांना मी नेहमी सांगायचो की, जर पक्ष मोठा करायचा असेल, तर कार्यकर्त्यांना बळ द्या, त्यांना वाढवा. कारण शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेत कुणीही मालक नाही. राजाचा मुलगा राजा नाही, तर जो काम करेल, तो राजा बनेल, असा शिवसेना पक्ष आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे झालेल्या आभार सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावले. या सभेला ५० सहस्र नागरिक उपस्थित होते, असे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत असून ‘आभार यात्रे’च्या निमित्ताने १५ फेब्रुवारी या दिवशी चंपक मैदान, रत्नागिरी येथे ‘आभार मेळवा’ झाला. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

कोकणात एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत ? ज्या पक्षाला विचारांची वाळवी लागली, त्या पक्षात राजन साळवी तरी कसे रहातील ? त्यामुळे तेही शिवसेनेत आले. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, तर काम करून उत्तर देतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी सांगितले.

या वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महिला सशक्तीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना चालू केली. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. आगामी निवडणुकांत शिवसेनेची शक्ती दाखवून द्यायची आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचा विजय होईल.

शिवसेनेचे नेते रामदास कदम या वेळी म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री शिंदे जेव्हा तोंड उघडतील, तेव्हा उद्धव ठाकरे यांना देश सोडून जावे लागेल. कोकण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची भूमी आहे. कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. आम्ही संपूर्ण कोकण भगवेमय केले. ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासला आहे. त्यांचे विचार पायदळी तुडवले आहेत.’’