कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचा केवळ एकमेव नगरसेवक शिल्लक !
(उबाठा – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ओरोस – भाजप कार्यकर्त्यांच्या १२ फेब्रुवारी या दिवशी येथे झालेल्या मेळाव्यात कुडाळ आणि देवगड नगरपंचायतीतील महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी, तसेच कुडाळ आणि देवगड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना (उबाठा) पक्षासाठी हा मोठा धक्का आहे.
कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता असतांना नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या माजी नगराध्यक्षा आफरीन करोल आणि माजी नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोघी राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. उबाठा शिवसेनेचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, श्रेया गवंडे, सई काळप आणि उदय मांजरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १७ सदस्यसंख्या असलेल्या या नगरपंचायतीत भाजपचे संख्याबळ आता १६ झाले असून मंदार शिरसाठ हे शिवसेनेचे (उबाठाचे) एकमेव नगरसेवक असणार आहेत.
देवगड नगरपंचायतीतील महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते नगरसेवक बुवा तारी, नगरसेवक संतोष तारी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. वाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, फणसे गावचे उपसरपंच, तसेच गिर्ये आणि मणचे येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे नेते अतुल काळसेकर, जिल्हा भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर आदी भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात हा पक्षप्रवेश
करण्यात आला.
सत्ताधारी पक्षाकडून लाखो रुपयांची आमिषे दाखवण्यात आली. त्यामुळे स्वतःच्या आर्थिक लाभासाठीच कुडाळचे नगरसेवक भाजपमध्ये गेले, अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.