नागपूर येथील दंगलीचे प्रकरण
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ मार्च या दिवशी नागूपर दंगलीचा आढावा घेतला. या वेळी वरिष्ठ अधिकार्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. नागपूर दंगलीत झालेल्या हानीची भरपाई दंगलखोरांकडून केली जाईल. विशेषतः त्यांनी पैसे भरले नाही, तर त्यांची संपत्ती विकून त्याची भरपाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी ४-५ घंट्यांतच स्थिती नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या असतील किंवा इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करायची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींचा वापर पोलिसांनी केला.
१०४ आरोपींची ओळख पटली, ९२ जणांना अटक !
१०४ लोकांची आतापर्यंत ओळख पटली आहे. त्यापैकी ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. १२ जण १८ वर्षांखालील असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. याहून अधिक लोकांना अटक केली जाणार आहे. सामाजिक माध्यमांचे मोठ्या प्रमाणात जाळे करून, ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा तिचा प्रसार व्हावा म्हणून पोस्ट केल्या, त्या सर्वांना दंगलखोरांसमवेतच सहआरोपी केले जाणार आहे. जवळपास ६८ पोस्टच्या आतापर्यंत ओळख पटवून त्या काढण्यात आल्या आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.