
सोलापूर – ‘रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ’ने येथे एका कार्यक्रमाद्वारे सोलापुरातील व्यवसाय आणि नोकरी या क्षेत्रांत उत्कृष्ट काम करण्यासह सामाजिक कार्यातही हातभार लावणार्या व्यक्तींना ‘व्होकेशनल एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ नावाने पुरस्कार देऊन गौरवले. शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांच्यासह एकूण ६ जणांना सोलापूरचे साहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुधीर खिराडकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. जान्हवी मखिजा आणि संचालक सुनील दावडा उपस्थित होते.

‘आत्मोन्नतीनंतर आपण समाजाचे देणे लागतो’, याची जाणीव ठेवली की, सामाजिक कर्तव्यपूर्तीनंतर समाजही आपला पुरस्कार देऊन गौरव करतो. ही आपली ओळख अनमोल असते, असे विचार साहाय्यक पोलीस आयुक्त खिराडकर यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
सर्व पुरस्कार विजेत्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. विजय आठवले यांनी मनोगत व्यक्त केले आणि क्लबचे आभार मानले.