गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती !

सोलापूर – येथील एम्.आय.डी.सी., नई जिंदगी परिसर आणि कणबस (ता. दक्षिण सोलापूर) येथे अवैधपणे रहात असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

गृह राज्यमंत्री कदम म्हणाले की, आतंकवाद विरोधी पथक (ए.टी.एस्.) आणि एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे, सोलापूर यांनी संयुक्त कारवाई करत या कारखान्यात पहाणी केली असता, तेथे श्री जगदंबा महिला रेडिमेड ड्रेसेस येथे १२ बांगलादेशी नागरिक सापडले. त्यानंतर तपास पथके बेंगळुरू आणि मुंबई येथे पाठवण्यात आली. या कारवाईत आणखी २ जणांना कह्यात घेतले असून एकूण १४ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
संशयास्पद नागरिकांची माहिती वेळोवेळी मिळावी, यासाठी नागरिक आणि व्यवसायिक यांनी सतर्क रहावे. घर भाड्याने देतांना किंवा कामगार नियुक्त करतांना त्यांची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने कामावर रुजू झाल्यास, संबंधित आस्थापनांवरही गुन्हे नोंद करण्यात येतील, असेही गृह राज्यमंत्री कदम यांनी सभागृहात सांगितले.