संगम माहुली (सातारा) येथे ‘प्री-वेडिंग फोटोशूट’ला प्रतिबंध !

सातारा, २२ मार्च (वार्ता.) – येथील संगम माहुली घाटावर अनेक ऐतिहासिक पुरातन मंदिरे आहेत; मात्र गत काही वर्षांपासून येथील घाटावर विवाहपूर्वीच्या चित्रीकरणाला म्हणजे ‘प्री-वेडिंग फोटोशूट’साठी अनेक जोडपी येत आहेत. या वेळी त्यांच्याकडून मंदिर परिसरामध्ये चप्पल-बूट घालून, तसेच असभ्य अंगविक्षेप करत छायाचित्रे काढण्यात येत आहेत. या प्रकारामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत आहे. याचा विचार करून ‘श्री काशीविश्वेश्वर देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने संगम माहुली येथील घाटावर विवाहपूर्वीच्या छायाचित्रीकरणासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. याविषयी भाविकांनी देवस्थान ट्रस्टकडे तक्रारी केल्या होत्या.

संगम माऊली येथील ऐतिहासिक घाटांवर विविध चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे; मात्र गत काही वर्षांपासून येथे विवाहपूर्वीच्या छायाचित्रांसाठी गर्दी होत आहे. याचा त्रास मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना होऊ लागला. (हे देवस्थान ट्रस्टच्या लक्षात का आले नाही ? देवस्थानांनी मंदिरांची सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी सतर्कतेने प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक)