‘श्रीराम सेने’चे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांनी घेतली प्रा. सुभाष वेलिंगकर यांची भेट

गोव्यातील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांवर केली चर्चा

डावीकडून श्री. नितीन फळदेसाई, श्री. प्रमोद मुतालिक, प्रा. सुभाष वेलिंगकर आणि श्री. शैलेंद्र वेलिंगकर

पणजी, २२ मार्च (वार्ता.) – गोवा प्रवेशबंदीच्या १० वर्षांच्या कालावधीनंतर ‘श्रीराम सेने’चे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांचे २१ मार्च या दिवशी गोव्यात आगमन झाले. हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांनी या वेळी ‘भारत माता की जय’ या संघटनेचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांची त्यांच्या पणजी येथील ‘मुक्ताई’ निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्याशी गोव्यातील ‘लव्ह जिहाद’, हिंदु जागरण, हिंदु रक्षा आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभागाचे अध्यक्ष आणि हिंदू रक्षा महाआघाडीचे श्री. नितीन फळदेसाई, कार्यकर्ते श्री. आनंद गुरव आणि श्री. संजय नाईक, तसेच ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांचे शाल आणि गोव्याची पारंपरिक समई देऊन स्वागत केले. हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांनी नंतर श्री मंगेश देवस्थानात जाऊन अभिषेक केला.

गोव्यात एकत्रपणे कार्य करण्यावर झाली चर्चा

हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्याशी केलेल्या चर्चेविषयी माहिती देतांना प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘एका ज्येष्ठ अधिवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यात ‘लव्ह जिहाद’ची कमीतकमी ३ सहस्र ५०० ते ४ सहस्र प्रकरणे आहेत; मात्र काही कारणांमुळे या प्रकरणांचा कुठेही गाजावाजा होत नाही. गोव्यात फोंडा, बेतुल, म्हापसा, डिचोली आणि मडगाव येथे ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे अधिक आहेत. गोव्यात कार्यरत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी आतंकवादी झाकीर नाईक याची गळाभेट घेणारी छायाचित्रे ‘फेसबुक’वर प्रसारित केली होती; मात्र त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नसेल, असे मला वाटते. या कार्यकर्त्यांना पकडण्याचा ‘फार्स’ करण्यात आला. वास्तविक हे प्रकरण पुढे गोव्यासाठी गंभीर आहे. हे गांभीर्य ना सरकारला, ना येथील हिंदूंना लक्षात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि आम्ही दोघांनी गोव्यात एकत्रपणे कार्य करावे, अशी चर्चा झाली. एकमेकांना सहकार्य करण्यावर आम्ही चर्चा केली.’’