खासदार रवींद्र वायकर यांची निवेदनाद्वारे केली मागणी !

मुंबई – केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यात यावा, त्याचप्रमाणे कोकण रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांची २० मार्चला लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहेत, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर ‘मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. यास पार्किंग, हॉटेल्स सुविधा करण्यात यावी. रेल्वेस्थानकावरील शौचालय, फलाट, तसेच ट्रकवर स्वच्छता ठेवण्यात यावी, अशी मागणीही वायकर यांनी केली आहे.
कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते; पण ही बैठक अद्याप झाली नाही. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलोमीटर) काम चालू करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले, तरी गोवा आणि महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास सिद्धता दर्शवली आहे, अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्र्यांना दिली. त्यांनीही याला तत्वता मान्यता दिली आहे.