नारायणगाव, १ मार्च (वार्ता.) – येथे शिवसेनेच्या वतीने महासभा आयोजित केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांसह नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव, भोसरी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यासाठी पुढील मागण्या केल्या.
१. जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गोद्रे (जुन्नर) येथे उभारण्यात येणार आहे.
२. शिवजन्मभूमी जुन्नरच्या चारही दिशांना महाद्वारे उभारली जावी त्यामुळे पर्यटकांना आपण शिवजन्मभूमीत आल्याचे लक्षात येईल.
३. बिबट सफारीची मान्यता मिळावी.
४. दर्याघाट मार्गे जुन्नरहून मुंबईला जाणार्या रस्त्यांसाठी मान्यता मिळावी.
५. अष्टविनायक ओझर येथे स्पिडबोट-नौकानयनास अनुमती देण्यात यावी.
६. नारायणगावच्या वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावावा.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. मला महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा आहे. महाराष्ट्रातील जनता हीच माझी संपत्ती आहे. जुन्नर येथील शेतकर्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणार्या पाणी योजनाही देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.’’