कोकणातील साहित्याचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करूया ! – नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग 

सावंतवाडीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन

साहित्य संमेलनात बोलतांना मंत्री नितेश राणे

सावंतवाडी – कोकणातील साहित्याचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करूया. यासाठी येत्या काळात जिल्ह्यातील ग्रंथालये आधुनिक करण्यासह ‘ई-लायब्ररी’सारखा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने आमचे नियोजन चालू आहे. त्यासाठी आम्ही सरकार म्हणून प्रयत्नशील आहोत; मात्र ते काम तुम्ही माझ्याकडून करून घ्या, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले.

शहरात २२ मार्च या दिवशी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (‘कोमसाप’च्या) माध्यमातून आयोजित साहित्य संमेलनात मंत्री राणे बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के आदी उपस्थित होते.

मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात नवे साहित्यिक तयार करायचे आहेत. त्यासाठी ‘मालवणी भाषा भवन’ उभारण्यासाठी मी आग्रही आहे. त्यासाठी आवश्यक असलेली भूमी जिल्ह्यातील साहित्यिकांनी सुचवावी. ते सूत्र मार्गी लागण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. कणकवली येथील वाचनालयाचा मी अध्यक्ष असून त्या ठिकाणी काम करत असतांना वाचनालयांना काय अडचणी येतात हे मला ठाऊक आहे. त्यामुळे या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न रहाणार आहेत.’’

हिंदुत्वाची भूमिका मांडतांना कितीही विरोध झाला, तरी मला फरक पडत नाही !

हिंदुत्वाच्या भूमिकेविषयी मंत्री राणे म्हणाले, ‘‘मी लढत असलेली लढाई विचारांची आहे. मी आमदार किंवा मंत्री असलो, तरी प्रथम मी ‘हिंदु’ आहे. ही भूमिका मांडतांना कितीही विरोध झाला, तरी मला फरक पडणार नाही आणि मी माझी हिंदुत्वाची भूमिका सोडणार नाही. माझी हिंदुत्वाची भूमिका उघडपणे मांडणार आहे.’’

या वेळी अन्य मान्यवरांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.