‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार !

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !

डावीकडून सद्गुरू स्वाती खाड्ये, दीपप्रज्वलन करताना श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध महाराज, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, श्री सुनील घनवट आणि श्री. आनंदराव पवळ.

शिवछत्रपतींचा अवमान सहन करणार नाही !

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ‘शिवाजी कोण होता ?’, असे पुस्तक विक्री होते. याच समवेत कोल्हापूर येथील विद्यापिठाचे नाव आदराने घेतले जाणे अपेक्षित असतांना ते ‘शिवाजी विद्यापीठ’ असे एकेरी उल्लेख करून ठेवण्यात येते. तरी यापुढील काळात कोट्यवधी हिंदूंसाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, तसेच ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे नामांतर होण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा एकमुखी निर्धार २३ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र समन्वय समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात करण्यात आला. या अधिवेशनाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सदिच्छा भेट दिली. हे अधिवेशन येथील छत्रपती ताराराणी चौकातील गीता मंदिरात पार पडले.

धर्म टिकवण्यासाठी घरापासून आरंभ करावा  – श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध महाराज

आद्य शंकराचार्य यांच्यासह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत रामदासस्वामी यांसह प्रत्येक संतांनी धर्मजागृतीचे कार्य केलेले आहे. संत रामदासस्वामी यांनी देशभर फिरून हिंदूंमध्ये जागृती केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना मौलिक उपदेश केला. हेच कार्य आज सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही क्षात्रतेजाच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे तोच आदर्श समोर ठेवून आपल्यालाही धर्म टिकवण्यासाठी घरापासून आरंभ करावा लागेल, असे मार्गदर्शन श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध महाराज यांनी केले.

या अधिवेशनात इचलकरंजी येथील राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. पंढरीनाथ ठाणेकर म्हणाले, ‘‘कित्येक वर्षांपूर्वी मला एका स्पर्धेच्या निमित्ताने ‘शिवाजी कोण होता ?’, हे पुस्तक बक्षीस म्हणून मिळाले. या पुस्तकाचे नाव वाचल्याक्षणी माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. हे पुस्तक मी तात्काळ संयोजकांना परत केले आणि कुणीही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठा नसून त्यांचा एकेरी उल्लेख मी सहन करणार नाही, असे संयोजकांना ठामपणे सांगितले.’’

अधिवेशानासाठी सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, अधिवक्ता यांसह ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. व्यासपिठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध महाराज, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. आनंदराव पवळ, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

प्रांतीय हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
हिंदु राष्ट्राच्या कार्यात आम्ही नेहमीच तुमच्यासमवेत ! – प्रमोददादा पाटील, संस्थापक, ‘छत्रपती ग्रुप’

गेल्या १० ते १५ वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती, तशी आता राहिली नसून सध्याच्या काळात युवकांचा सहभाग वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर असून तुमच्या कार्यात आमचा नेहमीच सहभाग असेल. आमच्या संस्थेची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यातून झाली आहे. शिवाजी विद्यापिठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून होते, हे पुष्कळ वेदनादायी आहे.

हिंदुत्वनिष्ठांवर बेछूट आरोप करणार्‍या पुरोगाम्यांच्या ‘इकोसिस्टम’ला प्रत्युत्तर द्या ! – सुनील घनवट

अर्बन नक्षलवादाचा मोठा धोका भारतीय व्यवस्थेसमोर असून उद्योजक, पत्रकार यांसह समाजसेवकांचा बुरखा पांघरून भारतीय समाजमन, तरुण यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्याचा प्रयत्न चालू आहे. विविध देशांमध्ये असलेली सरकारे उलथून टाकून तेथे अराजक निर्माण करण्याचे जागतिक पातळीवर ‘डीप स्टेट’ची व्यवस्था कार्यरत आहे. हिंदु धर्म, संत, हिंदुत्वनिष्ठ, हिंदूंचे आदर्श यांच्या विरोधात जाणीवपूर्वक खोटी कथानके पसरवली जात आहेत. यातीलच एक प्रकार म्हणून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जाणीवपूर्वक ‘भारत एक राष्ट्र नसून राज्यांचा समूह म्हणतात’, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतात. तरी यापुढील काळात हिंदु धर्म आणि हिंदुत्वनिष्ठांवर बेछूट आरोप करणार्‍या पुरोगाम्यांच्या ‘इकोसिस्टम’ला चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन समितीचे श्री. सुनील घनवट यांनी या वेळी केले.

प्रांतीय हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
उपस्थित संघटना आणि मान्यवर

या अधिवेशनासाठी हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय बजरंग दल, श्रीराम सेना, सनातन संस्था, वारकरी संप्रदाय यांच्यासह ‘नरवीर शिवा काशिद’ यांचे वंशज श्री. आनंदराव काशिद, ‘महा.एन्.जी.ओ. फेडरेशन’चे राज्य समन्वयक श्री. विजय वरूडकर, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, गीता मंदिराचे विश्वस्त श्री. हसमुखभाई शाह, ‘ऋण मातृभूमी’चे श्री. सौरभ निकम, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. महेश चौगुले, अधिवक्ता केदार मुनीश्वर, अधिवक्ता संग्राम पाटील, अधिवक्त्या रेखा भोसले, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. महेश चौगुले, श्री. संतोष हत्तीकर, श्री. दत्ता पाटील, कोल्हापूर येथील उद्योजक श्री. जयंतीलाल पटेल यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या अधिवेशनात विविध विषयांवर उद्बोधन सत्रे झाली. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि उपाय’ यांवर सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थितांनी संबोधित केले. या अधिवेशनात हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे यांचा अवैध मदरशाचे बांधकाम पाडण्यासाठी दिलेल्या यशस्वी लढ्यासाठी सत्कार करण्यात आला.