अन्यथा ठाकरे पद्धतीने आंदोलन !

पुणे : दुकानांच्या नावाची पाटी मराठी भाषेतून असावी, यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने झाली, तरीही अनेक ठिकाणी दुकानांच्या पाट्या पालटलेल्या नाहीत. आजही पुण्यातील टिळक रस्त्यावरील आणि इतर भागांमध्ये अनेक दुकानांच्या नावांच्या पाट्या ‘इंग्रजी’मध्ये आहेत. याविरोधात ‘मराठी भाषा गौरवदिना’च्या निमित्ताने पुणे शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या वेळी दुकानदारांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. सर्व दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत देण्यात आली. त्याच्या कार्यवाहीसाठी १५ दिवसांची मुदतही देण्यात आली. अन्यथा मराठी भाषेच्या सन्मानार्थ, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आमच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली. या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअशी आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन काय करत आहे ? |