भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत दिली माहिती
– श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी
मुंबई – पनवेलजवळील खारघरमध्ये ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ‘अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासीमुल उलुम हक्कानिया मशीद’ या संस्थेने आयोजित केलेल्या इज्तिमाला (इज्तिमा म्हणजे मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे) केवळ ५० सहस्र व्यक्ती उपस्थित रहातील, असे पत्र आयोजकांनी सिडकोला दिले होते. प्रत्यक्षात तेथे ३ लाखांहून अधिक मुसलमानांची गर्दी जमली होती, अशी धक्कादायक माहिती भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडकोच्या कार्पोरेट पार्क येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाला सिडकोकडून देण्यात आलेली अनुमती पडताळण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देतांना दिली.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले, ‘‘३०० स्वयंसेवक वाहतूककोंडी रोखण्यासाठी, ३०० स्वच्छता कर्मचारी, ३०० सुरक्षेसाठी इत्यादी एकूण १ सहस्र २०० स्वयंसेवक तैनात करण्याची ग्वाहीही आयोजकांनी दिली होती. इज्तिमा आयोजनाच्या ठिकाणी उत्सव चौकात शिवकुमार शर्मा यांना शिरस्राणाने (‘हेल्मेट’ने) मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा जीव गेला. तेथे ना वाहतूक पोलीस उपस्थित होते, ना आयोजकांचे स्वयंसेवक. पोलीस चौकीत जाऊन शिवकुमार शर्मा यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला; पण ७-८ मिनिटांत त्यांचा जीव गेला. स्वयंसेवकांपैकी कुणीच त्यांच्या साहाय्याला आले नाही. अशा वेळी ज्याने दायित्व घेतले, त्यांनी ते पार पाडले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
अनुमतीविषयी अन्वेषण करणार ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडकोच्या कार्पोरेट पार्क येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाला सिडकोकडून देण्यात आलेली अनुमती पडताळण्यात येईल. ही अनुमती किती कालावधीसाठी देण्यात आली ? याची पडताळणी करण्यात येईल. राज्यात यापुढे अधिक कालावधीसाठी चालू असणार्या धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देण्याविषयी दक्षता घेण्यात येईल’, असे आश्वासन गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
योगेश कदम पुढे म्हणाले की, या कार्यक्रमासाठी आयोजकांच्या मागणीनुसार ६०० पोलीस बंदोबस्तासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. कार्यक्रमाला अनुमती दिलेल्यांहून अधिक लोक जमले होते. पहिल्या दिवशी १५ सहस्र, दुसर्या दिवसी २५ सहस्र आणि तिसर्या दिवसी ३ लाख लोक उपस्थित होते. त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांना यापुढे अनुमती देतांना काळजी घेण्यात येईल.
खारघरचे मुंब्रा (ठाणे जिल्ह्यातील मुसलमानबहुल तालुका) करण्याचा डाव !
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, खारघर येथे अनधिकृतरित्या मशिदी उभ्या रहात आहेत. उपाहारगृहात आणि ‘बेसमेंट’ (तळघर) येथे नमाजपठणासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. रेल्वेमध्ये स्टिकर लावले जातात. त्यात ‘नमाजपठणाची वेगळी सुविधा देऊ’, अशा ‘ऑफर’ दिल्या जातात. या माध्यमातून खारघर, तळोजा परिसराचा मुंब्रा करण्याचा घाट घातला जात आहे. या इज्तिमाासाठी प्रारंभी ५८ दिवसांची अनुमती दिली गेली होती, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी याची नोंद घेतली. ‘एखाद्या संस्थेला धार्मिक कार्यक्रमांसाठी सरकारी भूखंडावर ५८ दिवसांची अनुमती दिली गेली असेल, तर संपूर्ण राज्यभर हा नियम प्रस्थापित होईल. त्यामुळे याची तातडीने नोंद घ्यावी’, अशी सूचना त्यांनी केली.