राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘आतंकवादी संघटना’ म्हटले !

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे की, जर सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी औरंगजेबाची कबर हटवून दाखवावी. तुषार गांधी, असदुद्दीन ओवैसी आणि संजय राऊत यांच्या अलीकडच्या विधानांवर दलवाई यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी भाजप सरकारची तुलना औरंगजेबाच्या क्रूर राजवटीशी केली आहे.
औरंगजेबाची स्तुती केल्याविषयी त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना ‘औरंगजेबाची स्तुती करू नका’, असा सल्ला दिला आणि म्हटले की, औरंगजेब हा क्रूर शासक होता आणि त्याची स्तुती करू नये. (जर औरंगजेब क्रूर असल्याचे दलवाई यांनाही वाटत असेल, तर ते औरंगजेबाची कबर तोडण्याच्या मागणीचे समर्थन का करत नाहीत ? वर त्याची कबर हटवण्यावरून ते चेतावणी देतात. यातून दलवाई यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्वत:च आधी व्यवस्थित विचार करून ठरवले पाहिजे. – संपादक) अबू आझमी यांना इतिहास वाचण्याची आवश्यकता आहे. हुसेन दलवाई यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरील असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानाचे समर्थन केले.
(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आतंकवादी संघटना !’
तुषार गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘कर्करोग’ म्हटले होते. या विधानाचे हुसेन दलवाई यांनी समर्थन केले आहे. दलवाई म्हणाले की, तुषार गांधी जे काही म्हणाले, ते योग्य होते. तुषार गांधी यांच्या जिवाला धोका आहे आणि सरकारने त्यांना सुरक्षा पुरवावी. मी आधीही सांगितले होते आणि आजही म्हणतो की, आर्.एस्.एस्. ही एक आतंकवादी संघटना आहे. तिच्या शाखांमध्ये चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात. (दलवाई यांच्या मानसिकतेसाठी अनुकूल असणारी विधाने करणार्यांना ते लक्षपूर्वक वेचून उचलून धरत आहेत, असेच या सर्व विधानांतून लक्षात येते ! – संपादक)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही केली टीका !
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी दलवाई म्हणाले की, सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांच्याविषयी चुकीच्या टिपण्या केल्या होत्या, हे खरे आहे. याखेरीज ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयीही नकारात्मक गोष्टी बोलले होते. (कोणत्याही सूत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ओढून त्यांच्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी काँग्रेसचे नेते सोडत नाहीत. यावरून हिंदुत्वनिष्ठ शासनाने दलवाई यांच्यावर कारवाईच केली पाहिजे ! – संपादक) जेव्हा नेहरूंना हे कळले, तेव्हा त्यांनी सावरकरांची पुस्तके काढून टाकली; पण देवेंद्र फडणवीस आता ते का करत नाहीत ? (नेहरू यांच्याविषयी एवढा पुळका असलेल्या दलवाई यांना ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या नेहरू यांच्या पुस्तकात त्यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेले अवमानास्पद लिखाण दिसत नाही कि त्याकडे ते सोयीस्कर कानाडोळा करत आहेत ? – संपादक) आर्.एस्.एस्.चे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना राजा मानत नव्हते, तर एक व्यावसायिक मानत होते. हे अत्यंत लज्जास्पद आहे.
संपादकीय भूमिका
|