सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा, अन्यथा रुग्णालय बंद पाडू !

‘सामाजिक बांधीलकी’ आणि ‘युवा रक्तदाता संघटना’ यांची प्रशासनाला चेतावणी

सावंतवाडी – येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ञ आणि चेतनासंस्थेच्या रोगांवर उपचार करणारा तज्ञ (न्युरोलॉजिस्ट) ही रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत अन्यथा २४ मार्च या दिवशी तीव्र आंदोलन करून रुग्णालय बंद पाडू, अशी चेतावणी ‘सामाजिक बांधीलकी’ आणि ‘युवा रक्तदाता संघटना’ यांनी दिली आहे. याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, राज्याचे आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘सावंतवाडी उपजिल्हा (कुटीर) रुग्णालयामध्ये हृदयरोगतज्ञ आणि न्युरोलॉजिस्ट नसल्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयामध्ये किंवा बांबोळी, गोवा यथील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. तसेच या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विविध स्तरांवरील कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. कायमस्वरूपी चांगला वैद्यकीय अधीक्षक मिळावा’, अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

‘२४ मार्च या दिवशी केल्या जाणार्‍या आंदोलनात सावंतवाडी शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन प्रश्न मांडायचे आहेत’, असे आवाहन सामाजिक बांधीलकीचे रवि जाधव आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले आहे.