मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

गेले एक-दीड मास चालू असलेल्या ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश यांच्या निवडणुकींचा निकाल लागला. यात रथी-महारथी असणारे काही नेते जिंकले, तर काही हरले. त्यात ठळक नाव हे ममता बॅनर्जी यांचे आहे, हे सांगायला नको. ममता बॅनर्जी यांना त्यांचे पूर्वीचेच सहकारी सुवेंदु अधिकारी यांनी १ सहस्र ९६५ मतांनी पराभूत केले. निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांना हा पराभव मान्य नसल्याने त्यांनी न्यायालयात जाऊन दाद मागण्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पराभवामागील कारणांचा शोध प्रत्येक जण घेऊ लागला आहे, मग स्वतः ममता बॅनर्जी असोत किंवा अन्य राजकीय पक्ष, विश्‍लेषक, पत्रकार असोत. यात आनंदाची गोष्ट आहे की, हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी बंधने घालणारी व्यक्ती पराभूत झाली आहे, हे येथे महत्त्वाचे आहे. निवडणुकीच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांनी दुर्गासप्तशतीचे पठण केले, दुर्गापूजा केली; मात्र त्याच वेळेस त्यांनी मजारांमध्ये जाऊन चादर चढवली होती. भाजपच्या हिंदुविरोधी असल्याच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजा करण्याचा प्रयत्न केला, तरी स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ दाखवतांना त्यांनी मजारमध्ये जाऊन मुसलमानांना खुश करण्याचाही प्रयत्न केला. दोन दगडांवर पाय ठेवण्याचा हा प्रयत्न होता. मजारात गेल्यामुळे, तसेच सत्ताकाळात त्यांनी मुसलमानांचे करता येईल तितके लांगूलचालन केल्याने त्यांच्या पक्षाला राज्यातील ३० टक्के मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळाली आणि त्या पुन्हा सत्तेत आल्या, हे आता स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे हिंदुत्वाच्या आधारे निवडणूक लढवणार्‍या भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांनी ३ वरून ७७ वर उडी मारली, हे विशेषच म्हटले पाहिजे; मात्र २०० हून अधिक जागा मिळण्याचे लक्ष्य दूरच राहिले. त्यामुळे ३ वरून ७७ वर गेल्याचा आनंद ते घेऊ शकले नाहीत. प्रसारमाध्यमे आणि भाजपविरोधी पक्ष यांनी याकडे दुर्लक्ष करत लक्ष्य न गाठल्याने भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न चालू केला आहे. तरीही भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल. यातून देशात एक वेगळा संदेश गेला आहे आणि तो धोकादायक आहे, हे आता हिंदूंनी लक्षात ठेवायला हवे. तसेच याचे चिंतन भाजपलाही करावे लागणार आहे की, हिंदूंचे ध्रुवीकरण करता करता मुसलमानांचे ध्रुवीकरण कसे झाले ? हा ‘बंगाल पॅटर्न’ उद्या संपूर्ण भारतात करण्याचा भाजपविरोधी पक्षांनी प्रयत्न केला आणि त्याला मुसलमानांनी प्रतिसाद दिला, तर ते हिंदूंसाठी आणि पर्यायाने भारतासाठी मोठेच संकट ठरू शकते. ‘भाजप सत्तेत आला, तर आपल्याला देशातून बाहेर काढले जाईल’, असे बांगलादेशी घुसखोर जे आता मतदार झाले आहेत, त्यांना वाटले असणार; कारण सत्तेत आल्यावर आसामप्रमाणे बंगालमध्येही एन्.आर्.सी. लागू करू आणि घुसखोरांना हाकलून लावू असे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसाराच्या वेळी म्हटले होते. त्यामुळे हे मुसलमान तृणमूलला शरण गेले. हे मुसलमान काँग्रेस आणि माकप यांना यापूर्वी मतदान करत होते; मात्र त्यांनी या वेळी या दोघांकडे पाठ फिरवून एकगठ्ठा मते तृणमूलच्या पारड्यात टाकली आणि स्वतःचे रक्षण केले. ममता (बानो) यांच्यामुळेच आपण बंगालमध्ये ‘सुरक्षित’ आहोत, याची त्यांना शाश्‍वती असल्याने त्यांनी हा मार्ग निवडला. आता देशातील अन्य राजकीय पक्षांनी ममता बॅनर्जी यांना नेता करून तिसर्‍या आघाडीची मोट बांधली, तर देशातील मुसलमान त्यांची एकगठ्ठा मते या आघाडीला देऊ शकतात, असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. पूर्वी हिंदूंच्या मतांचे विभाजन होत आणि मुसलमानांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळत असत आणि काँग्रेस जिंकून येत होती. भाजपने हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण केले आणि मुसलमानांची मते अन्य पक्षांमध्ये विभागली गेली अन् भाजपला यश मिळाले; मात्र तिसरी आघाडी झाली, तर भाजपला मोठे आव्हान उभे राहील. सध्याच्या कोरोनाच्या काळात जनतेची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि अन्य काही उच्च न्यायालये यावरून केंद्र सरकारवर टीका करू लागली आहेत. या स्थितीचाही फटका भाजपला पुढील निवडणुकीत बसू शकतो. याचा विचार भाजपने करण्याची आवश्यकता आहे.

धर्मद्वेषी आणि धर्मद्रोही आपटले !

हिंदुद्रोही ममता बॅनर्जी जशा पराभूत झाल्या तसे अन्य काही असेच उमेदवार या निवडणुकीत पराजित झाले आहेत. त्यामुळे धर्मप्रेमी हिंदूंनी आनंद व्यक्त करण्याची आवश्यकता आहे. या उमेदवारांनी हिंदु धर्म, देवता यांचा अवमान केला होता. हे सर्वजण मोठे नेते किंवा जनाधार असलेले होते, तरी त्यांचा पराभव झाला, हे लक्षात घ्यायला हवे. यात सर्वप्रथम बंगाली अभिनेत्री सायोनी घोष यांचे नाव येते. तृणमूल काँग्रेसकडून दक्षिण आसनसोल येथून त्या पराजित झाल्या. त्यांना भाजपच्या अग्नीमित्र पॉल यांनी पराभूत केले. याच सायनी घोष यांनी शिवलिंगावर निरोध घालत असल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमातून प्रसारित करून शिवलिंगाचा अवमान केला होता. त्यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा गुन्हाही नोंदवला गेला होता. घोष यांना पराजित करून हिंदूंनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असली, तरी त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. केरळमधील काँग्रेसच्या बिंदु कृष्णा यांनी वर्ष २०१७ मध्ये बीफ फेस्टिव्हल आयोजित केले होते. त्या वेळी त्यांनी ‘स्वादिष्ट गोमांस पंतप्रधान मोदी यांना पाठवले जाईल’, असे म्हटले होते. त्या कोल्लम येथे उभ्या होत्या. त्यांनाही हिंदूंनी पाडले आहे. याच सूचीमध्ये केरळमधील ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’चे राज्य सचिव एम्. स्वराज यांचे नाव आहे. त्यांनी भगवान अयप्पा यांचा अवमान करतांना ‘वर्ष २०१८ मध्ये भगवान अयप्पा यांचा मल्लिकापूरम्मध्ये विवाह झाला आहे. त्यामुळे शबरीमला मंदिरात कुणीही जाऊ शकतो’, असे विधान केले होते. तेही पराभूत झाले आहेत. अशा प्रकारची विधाने करणार्‍या भाजपच्याही एका नेत्याला हिंदूंनी पराभूत केले आहे. आसामच्या गौरीपूर येथील उमेदवार बनेंद्रकुमार मुशहरी यांनी ‘गोमांस हे भारताचे राष्ट्रीय भोजन’, असे म्हटले होते.

यातून लक्षात येते की, हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान करणार्‍यांना मग त्या ममता बॅनर्जी असोत किंवा अन्य कुणी, त्यांना वैयक्तिक स्तरावर ते धडा शिकवू शकतात. ही या निवडणुकीतील चांगली गोष्टच म्हणावी लागेल.