कुर्ला येथे हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत ‘हिंदु दिनदर्शिके’चा देखावा !

मुंबई, २९ मार्च (वार्ता.) – हिंदु नववर्ष स्वागतयात्रा समिती, कुर्ला (प.) यांच्या वतीने मागील १७ वर्षांपासून येथे हिंदु नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रतिवर्षी कुर्ला येथील सहस्रो हिंदू सहभागी होतात. यंदा समितीने प्रथमच ‘हिंदु दिनदर्शिके’चे प्रकाशन केल्याने त्याविषयी अधिक जागृती करण्यासाठी याच विषयावर आधारित विविध चित्ररथ स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. परंपरागत ढोल पथके, शिवकालीन शस्त्रकला प्रात्यक्षिके, लहान मुलांचे मनोरे आणि लेझीम, पंजाबी भांगडा नृत्य, दाक्षिणात्य चेंडा वाद्य पथक यांसह सहस्रो नागरिक पारंपरिक वेशात स्वागतयात्रेत सहभागी होतील.

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी १० वाजता श्री सर्वेश्वर मंदिर, शिक्षकनगर, गौरीशंकर मंदिर आणि जयभवानी चौक या ४ ठिकाणाहून एकाच वेळी स्वागतयात्रांचा आरंभ होऊन दुपारी १२ वाजता भारत सिनेमा येथे स्वागतयात्रा एकत्र येतील. यंदाचे वर्ष हे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे त्रिजन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने भारतातील पहिले महिला गोविंदा पथक कुर्ला येथील गोरखनाथ मंडळ हे भारत चित्रपटगृह येथे दुपारी १२ वाजता थर लावून मानवंदना देणार आहे. त्यानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाजवळील जागृत विनायक मंदिरात महाआरतीने स्वागतयात्रेची सांगता होईल. अधिक माहितीसाठी ९५२४४०००७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समितीने केले आहे.