हिंदु प्रतिष्ठानचा ‘हिंदु कुलभूषण’ पुरस्कार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना प्रदान !

पुणे – संसदेत बोलणार्या खासदारांनी किमान सिद्धता करून चर्चेत सहभाग घ्यावा आणि नंतर स्वत:चे मत व्यक्त करावे. वर्ष १९७६ मध्ये देशातील सर्व राजकीय पक्षांनी भारताच्या उद्देशिकेत कोणत्याही चर्चेविना ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घातला. या वेळी काँग्रेसचे ३५ खासदार हे ‘पॅरोल बेसिस’वर होते. हे सोव्हिएत युनियनच्या एका उत्तरदायी नागरिकाने लिहिले आहे. यावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही. संसद सभागृहात स्वार्थ समोर ठेवून राजकीय सूत्र मांडू नये, तर राष्ट्रीय स्वार्थ दृष्टीसमोर ठेवून राजकीय सूत्र मांडले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. निगडी येथील ग.दि. माडगूळकर सभागृह येथे हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने हिंदु स्वाभिमान दिवसानिमित्त आणि शिवजयंतीचे औचित्य साधून पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना ‘हिंदु कुलभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या पुरस्कार प्रदान प्रसंगी ‘हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान’चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, शिवजयंती उत्सवाचे समन्वयक कैलास बारणे, अतुल आचार्य, दिलीप कुलकर्णी आणि तेजस्विनी जटाळ आदी उपस्थित होत्या.