मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

अंत्री मलकापूर (जिल्‍हा अकोला) येथे ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषद’ !

डावीकडून श्री. किशोर कापडे, श्री. प्रशांत देशमुख, दीपप्रज्वलन करतांना पू. अशोक पात्रीकर, स्वामी परमानंद राम भारतीजी महाराज, श्री. सुनील घनवट, श्री. अरविंद देठे

४०० हून अधिक मंदिर विश्वस्‍त, प्रतिनिधी, पुरोहित, अधिवक्ते आणि मंदिर अभ्यासक सहभागी !

अकोला, २९ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केले. २८ मार्च या दिवशी अंत्री मलकापूर (ता. बाळापूर, जिल्‍हा अकोला) येथील स्‍वयंभू महादेव मंदिर येथे महाराष्‍ट्र मंदिर महासंघ, श्री चंडिका देवी संस्‍थान कुरणखेड आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्त वतीने ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषदे’चे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

अधिवेशनाला ‘अंत्री महादेव संस्‍थान’चे अध्‍यक्ष श्री. अरविंद देठे, महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे श्री. अनुप जयस्‍वाल, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्‍वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, ह.भ.प. श्री. रमेश इस्‍लापे (पारस), ह.भ.प. वासुदेवराम महल्ले, अकोला, श्री. शुकदास गाडेकर (श्री गुरुदेव सेवा आश्रम पारसुल), श्री. उज्‍ज्‍वल देशमुख (कुरणखेड महादेव संस्‍थान), श्री. तुळसीराम ईस्‍तापे, श्री. महेश गाडे, मुंडगाव, ह.भ.प. श्रीकांत महाराज राऊत आदी मान्‍यवरांसह अकोला जिल्‍ह्यातील ४०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्‍त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्‍या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते आणि मंदिर अभ्‍यासक सहभागी झाले होते.

परिषदेचा आरंभ वेदमंत्रपठणाने झाला. त्‍यानंतर स्‍वामी परमहंस राम भारतीजी महाराज, श्री चंडिकादेवी संस्‍थान, कुरणखेडचे अध्‍यक्ष श्री. प्रशांतभाऊ देशमुख, पू. अशोक पात्रीकर, स्‍वयंभू महादेव मंदिर अंत्रीचे उपाध्‍यक्ष श्री. किशोर कापडे आणि मंदिर महासंघाचे राष्‍ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

मंदिर संघटनेच्या कार्यात युवकांना सहभागी करा ! – परमहंस स्वामी राम भारतीजी महाराज, संन्यास आश्रम, चांगेफळ

आम्ही युवकांना मोठ्या प्रमाणात रामकथेशी जोडले आहे. काकड आरतीसाठी पहाटेच्या वेळी आमच्याकडे १ सहस्र ते १ सहस्र ५०० तरुणांचा सहभाग असतो. मंदिर संघटनेच्या कार्यात युवकांना सहभागी करायला हवे.

विश्वस्‍तांनी संघटितपणे कार्य केल्‍यास मोठा दबावगट निर्माण होईल ! – प्रशांत देशमुख, अध्‍यक्ष, श्री चंडिका देवी संस्‍थान, कुरणखेड

मंदिरांमुळे हिंदु संस्‍कृती आणि परंपरा यांचे जतन अन् संवर्धन होते. सामाजिक जीवनात मंदिराचे अनन्‍यसाधारण स्‍थान आहे. हे लक्षात घेऊन एकट्या-दुकट्याने मंदिर चालवण्‍यापेक्षा सर्व मंदिरांच्‍या विश्वस्‍तांनी ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’च्‍या अंतर्गत संघटितपणे कार्य केल्‍यास मोठा दबावगट निर्माण होईल. त्‍यातून सर्व मंदिरांचा विकास करणे शक्‍य होईल.

भाविकांच्या आध्यात्मिक लाभासाठी मंदिराचे सुव्यवस्थापन आवश्यक ! – अरविंद देठे, अध्‍यक्ष, अंत्री महादेव संस्‍थान

मंदिराचे पावित्र्य जपण्‍यासाठी विश्वस्‍तांनी प्रयत्नशील असावे. त्‍यामुळे भक्तांना मंदिराचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ होऊ शकतो. विश्वस्‍तांनी सामूहिक आरती, संतांचे मार्गदर्शन, धर्मशिक्षणवर्ग यांचे नियमित आयोजन करावे, तसेच महापुरुष आणि अध्यात्म यांची माहिती देणारे फलक मंदिरात लावल्‍यास भाविकांमध्‍ये जागृती होईल.

क्षणचित्रे

१. मंदिर महासंघाचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्‍या संदेशाचे वाचन सनातन संस्‍थेचे श्री. गिरीश कुलकर्णी यांनी केले.

२. उपस्थितांचे स्‍वागत आणि प्रस्‍तावना महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे श्री. प्रशांत देशमुख यांनी केली. आभार प्रदर्शन हिंदु जनजागृती समितीचे अकोला समन्‍वयक श्री. अमोल वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आनंदी वानखडे आणि श्री. हेमंत खत्री यांनी केले.


मंदिर न्‍यास परिषदेत एकमताने संमत झालेले काही ठराव !

१. काशी आणि मथुरा ही तीर्थक्षेत्रे धर्मांधांच्या अतिक्रमणापासून मुक्त करण्‍यासाठीचा खटला द्रुतगती न्‍यायालयाच्‍या माध्‍यमातून निकाली लावावा.

२. मंदिरांचे व्‍यवस्‍थापन ‘सेक्युलर’ सरकार करू शकत नाही, हे न्‍यायालयांनी अनेक वेळा सांगूनही आजपर्यंत महाराष्‍ट्रातील अनेक मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशांचे पालन करत सरकारने राज्‍यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्‍या कह्यात द्यावीत.

३. मंदिरांमध्‍ये भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला निधी म्हणजे सरकारला दिलेली देणगी किंवा कर नाही. त्‍यामुळे सरकारला मंदिरांतील पैसा विकासकामांसाठी वापरण्‍याचा कुठलाही अधिकार नाही. यासाठी महाराष्‍ट्र सरकारने मंदिरांची संपत्ती विकासकामांसाठी न वापरण्‍याची घोषणा करावी.

४. धर्मादाय आयुक्त कार्यालये मंदिरांना विविध कारणांसाठी देणगी देण्‍यासाठी आज्ञापत्रे पाठवत आहेत. अशी नियमबाह्य सरकारी पत्रे महाराष्‍ट्र सरकारने थांबवावी आणि मंदिरांचा निधी केवळ धार्मिक कार्यासाठी उपयोगात आणला जावा, अशी सूचना धर्मदाय आयुक्त कार्यालयाला करावी.

५. महाराष्‍ट्रातील पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्‍या; परंतु प्रशासन, पुरातत्व विभाग यांच्‍याकडून दुर्लक्षित झालेल्‍या मंदिरांचा तात्‍काळ जीर्णोद्धार करण्‍यासाठी सरकारने अर्थसंकल्‍पात भरीव प्रावधान करावे.

६. महाराष्‍ट्रातील धार्मिक महत्त्व असलेली तीर्थक्षेत्रे, श्रीक्षेत्रे आणि गडदुर्ग यांवरील मंदिरांवर झालेल्‍या अतिक्रमणाचे महाराष्‍ट्र सरकारने सर्वेक्षण करून तात्‍काळ ती अतिक्रमणे दूर करावीत. या संदर्भात चालू असलेल्‍या न्‍यायालयीन खटल्‍यांसाठी जलदगती न्‍यायालये निर्माण करावीत.

७. मंदिरांच्‍या परिसरात, तसेच तीर्थक्षेत्रांच्‍या ठिकाणी पावित्र्यरक्षण व्‍हावे, यासाठी मद्य आणि मांस यांची विक्रीहोणार नाही, याची घोषणा महाराष्‍ट्र सरकारने करावी आणि यासाठी अधिसूचना जारी करावी.

८. महाराष्‍ट्रातील मंदिरांच्‍या पुजारी वर्गाचे उत्‍पन्‍न नगण्‍य आहे. यामुळे महाराष्‍ट्र सरकारने मंदिरांच्‍या पुजार्‍यांना प्रतिमाह मानधन देण्‍याची व्‍यवस्‍था करावी.