गुढीपाडवा साजरा करण्यामागे आहेत या अनेक कथा !

भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुक्ल प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल चालू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते ? गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच का साजरा करतात ? गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते ? गुढी उभारून झाल्यावर विष्णु देवाची पूजा का करतात ? या सर्वांचे सदर्भ या कथांमध्ये आहेत, तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना ठाऊक असायलाच हव्यात.

ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती !

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो हाच पवित्र दिवस ! ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे ‘सत्य-युगा’चा प्रारंभ झाला आणि म्हणूनच नूतनवर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो, असे म्हणतात. या दिवशी विश्वातील तेज तत्त्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमातून आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो.

हे एक कारण महाभारतामध्ये सापडते !

गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्येसुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नावाच्या राजाने इंद्राद्वारे त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून भूमीमध्ये रोवली आणि दुसर्‍या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात, अशी आख्यायिकासुद्धा आहे.

गुढी विजयध्वजाचे प्रतीक !

गुढी म्हणजे केवळ ब्रह्मध्वजच नाही, तर ती विजयध्वजसुद्धा आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले, तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी प्रभु श्रीरामांचा १४ वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात, असे सांगितले जाते.

मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म !

भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुक्ल प्रतिपदेचाच ! शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने बळजोरीने वेदहरण केले आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवता, ऋषीमुनी यांनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला ‘‘भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळवले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की, माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे, तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याविना आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंखास धारण केले.

– प्रियंका वाणी (साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’) (कथांसह शास्त्र समजून हा सण भक्तीभावाने साजरा करूया.)

संपादकीय भूमिका

गुढीपाडवा साजरा करण्यामागे असलेल्या  अनेक कथा  सर्वांना ठाऊक असायलाच हव्यात !