वाहतुकीच्या वेगामध्ये उपाययोजनांमुळे १०.५ टक्क्यांनी वाढ !
पुणे – वाहतूक विभागाने शहरातील ५९ ठिकाणी प्रमुख पालट केले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीच्या वेगामध्ये वाढ झाली असून वाहतूककोंडी होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे. सप्टेंबर २०२४ पासून केलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग १०.५ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शहरातील २६५ किलोमीटर अंतर असलेल्या एकूण ३३ प्रमुख रस्त्यांची निश्चिती करून रस्त्याच्या सुधारणेसाठी विविध उपाययोजना केल्या. यात वाहतूक अभियांत्रिकी पालट, तंत्रशुद्ध पद्धतीने वाहन संख्येच्या आधारे उजवीकडे आणि डावीकडे वळण बंद किंवा चालू करणे, चिंचोळ्या रस्त्यावरील (बॉटल नेक) कोंडी दूर करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे पी.एम्.पी.एम्.एल्.चे थांबे हलवणे, खासगी बसगाड्या, रिक्शा स्थानके स्थलांतरित करणे यांसह अनेक उपाययोजना करण्यात आल्या.
रस्त्यांवरील कोंडी ही अचानक अधिक संख्येने येणारी वाहने, नागरिकांच्या चुका, वाहने रस्त्यांवर बंद पडणे, बेशिस्त पद्धतीने वाहने लावणे, खड्डे, रस्त्यांची वेगवेगळी कामे, रस्त्यावर वाहतूक पोलीस नसणे आदी कारणांनी होत असल्याचे निदर्शनास आले. गेल्या ३ महिन्यांत ११४ वेळा वाहने बंद पडून कोंडी झाली.