गुढीपाडवा

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ‘वेदांग ज्योतिष’ या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी यांचे प्रतीक आहे, असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

गुढीपाडवा – एकाच वर्षात दोन गुढीपाडवे 

साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदु वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो; पण शके १९३८ मध्ये दोन गुढीपाडवे आले होते.

८ एप्रिल २०१६ पासून चालू होणार्‍या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ या दिवशी गुढीपाडवा आलाच होता; पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ या दिवशी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ या दिवशी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला.

गुढीपाडवा – सांस्कृतिक इतिहास

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभु श्रीरामचंद्रांनी १४ वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षस यांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी ६ सहस्र मातीच्या सैनिकांचे पुतळे सिद्ध केले आणि त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाले.

प्राचीन मानवाने जेव्हा देवाचा विचार करून पूजा करायला प्रारंभ केला, ती पूजा देवीच्या, स्त्रीच्या रूपात चालू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती, असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले. पाडव्यापासून सिद्धतेला प्रारंभ होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तीरूपाची पूजा करतात. यालाच ‘चैत्र नवरात्र’ म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना ‘पार्वतीचे रूप’ असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की, माहेरवाशीण म्हणून महिनाभर माहेरी रहाते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षय्य तृतीया या दिवशी ती सासरी जाते.

(संदर्भ – शक्रोत्सवाचे (इंद्रोत्सवाचे) उल्लेख संस्कृत रघुवंशात आणि भासांचे (नाटककार) ‘मध्यमव्यायोग’, शुद्रकाचे ‘मृच्छकटिकम्’ या नाटकांमध्ये आले आहेत.)

गुढीपाडवा – महाभारतातील उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.

महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या सवंगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे, तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.

गुढी शब्दाची उकल

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’, असा आहे, तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. दाते, कर्वे लिखित ‘महाराष्ट्र शब्दकोशा’चा आधार घेतला तर  गुढ्या घालुनी वनीं राहूं, म्हणा त्यातें । – प्रला १९

असे उदाहरण येते. यातील ‘गुढ्या’ या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.

हिंदीत ‘कुडी’ या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे ‘ग’ चा ‘क’ (अथवा ‘क’ चा ‘ग’) होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता, येते तरीही रहाण्याची जागा या अर्थाने ‘गुडी’ हा शब्द येऊन दक्षिणेतील विशेषकरून आंध्रातील स्थलनामांची संख्या अभ्यासली असता, लाकूड या अर्थाने तेलुगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठीने बनवलेले घर, हे पहाता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशांत गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित् गुढीचा ‘लाकूड बांबू/काठी’ हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्दसंग्रहातून मागे पडला असावा; पण आंध्राशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

गुढीपाडवा – पूजा पद्धती

संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष चालू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती – जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल, ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल, त्या वाराचा जो ग्रह असेल, तो त्या संवत्सराचा अधिपती, असे मानले जाते. म्हणजे आजपासून चालू होणारे वर्ष हे मंगळवारी चालू होत असेल, तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती, असे समजले जाते. ६० संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे.

एका विभागणीत ५ संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने ६० संवत्सरांची १२ युगे मानली जातात, तसेच संवत्सर चक्रातील ८ व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७ व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णु आहे, असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वांत श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते, असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात. या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात.

आरोग्यदृष्ट्या महत्त्व

चैत्र शुक्ल प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांसमवेत वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत, असे आयुर्वेदात मानले जाते. शरिराला थंडावा देणार्‍या कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

गुढीपाडवा – कृषीविषयक महत्त्व !

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षा होते. त्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणार्‍या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे, असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

गुढीपाडवा – सामाजिक महत्त्व

गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे, असाही संकेत रूढ आहे. या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट आणि गुढीपाडवा किंवा हिंदु नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे.

मिरवणूक

गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु संस्कृतीची चुणूक दाखवणार्‍या मिरवणुका काढल्या जातात. महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी होतात.

शालिवाहन शक आणि संवत्सर

भारतात वेगवेगळ्या दिवशी नवीन वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या, तरी महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक चालू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग सिद्ध करण्याची अनेक कोेष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले, तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे.

या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.

जय नावाच्या २८ व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७ व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८ व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७ च्या संवत्सरापर्यंत सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तवले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुख-शांतीमय असे होते, तसेच प्रमुख व्यवसाय शेती होता. पाऊस कसा पडेल ? नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती; पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालवला की, पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे.

(साभार : ‘संतसाहित्य’चे संकेतस्थळ)