एस्.टी.कडून उन्हाळ्यासाठी अतिरिक्त वाहतूक !
मुंबई – प्रतिवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांच्या सेवेसाठी १५ एप्रिल ते १५ जून २०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून नियोजित फेर्यांच्या व्यतिरिक्त अधिक वाहतूक केली जाते. यंदाही उन्हाळ्याच्या कालावधीत प्रतिदिन लांब पल्ल्याच्या ७६४ फेर्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेर्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवासी गर्दी होणार्या मार्गावर १५ एप्रिल २०२५ पासून जादा फेर्या टप्याटप्याने चालू करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एस्.टी.च्या मध्यवर्ती कार्यालयाद्वारे राज्यातील विविध मार्गांवरील ७६४ जादा फेर्यांना संमती देण्यात आली असून या जादा फेर्यांद्वारे दैनंदिन २.५० लाख किमी चालवण्यात येणार आहे.
उन्हाळी जादा फेर्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प. महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in वर तसेच npublic.msrtcors.com या संकेतस्थळावर, तसेच ‘मोबाईल ॲप’द्वारे, महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या माध्यमातून जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.