Sadhvi Pragya Singh : मालेगाव येथे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्यानिमित्त विराट हिंदु संत संमेलन !

  • मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त अनुमती !

  • अटी घालून सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रम करण्याची मुभा

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

मुंबई – भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त ३० मार्च या दिवशी होणार्‍या विराट हिंदु संत संमेलनाला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अनुमती दिली आहे; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता उच्च न्यायालयाने काही अटीसुद्धा घातल्या आहेत. या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा यांना ‘हिंदुवीर’ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे समजते. ‘कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होणार नाही. प्रक्षोभक भाषण केले जाणार नाही, तसेच सायंकाळी ५ वाजण्याच्या आत कार्यक्रम संपवावा, याची हमी आयोजकांनी पोलिसांना लेखी स्वरूपात द्यावी’, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या अनुमतीनंतर ३० मार्च या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत हा कार्यक्रम होईल.

न्यायालयाने म्हटले आहे की, अशा प्रकरणांमध्ये अतीसंवेदनशील असू शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ‘जगा आणि जगू द्या’ या बोधवाक्याचे समर्थन करण्यावर न्यायालय विश्वास ठेवते. संवेदनशीलतेचा प्रचार इतका वाढवू नये की, ती अतिरेकी होईल. जर तुमचा शेजारी आनंदी असेल, तर तुम्हीही आनंदी आहात.

काय आहे प्रकरण ?

१८ फेब्रुवारी या दिवशी मालेगाव तहसीलदार आणि चावणी पोलीस ठाण्यात ३० मार्च या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘विराट हिंदु संत संमेलन’ आयोजित करण्याची अनुमती संघटनेने मागितली होती. २५ मार्च या दिवशी नाशिकच्या कार्यकारी दंडाधिकार्‍यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर वक्ते यांनी भूतकाळात केलेल्या प्रक्षोभक विधानांविषयी पोलिसांच्या अहवालांचा संदर्भ देत या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती. त्यामुळे संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.