ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

जयपूर (राजस्थान) – येथे होणार्‍या ज्ञानम महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी सहभाग घेतला. या वेळी आयोजित हिंदु राष्ट्र का ?, या विषयावरील ऑनलाईन परिसंवादात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितिचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी सहभाग घेतला. ज्ञानम्’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. दीपक गोस्वामी यांनी चर्चासत्राचे निवेदन केले.

श्री. चेतन राजहंस

वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र सर्वांचे अभ्युदय करणारे राष्ट्र असेल ! – चेतन राजहंस

वसुधैव कुटुम्बकम् ॥ ही हिंदूंची संस्कृती आहे. विश्‍वकल्याणाची भावना मनामध्ये ठेवणारे हिंदू सर्वांना स्वत:त सामावून घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीत जनता सुखी होती. सर्वांचे कल्याण होऊ शकते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात दाखवून दिले. त्यांचे हिंदवी स्वराज्य हे हिंदु राष्ट्रच होते. सनातन संस्कृतीमध्ये प्राणीमात्रांचे अभ्युदय सांगितले  आहे. संस्कृतमध्ये बहिष्कार हा शब्दच नाही. त्यामुळे वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र हे सर्वांचा अभ्युदय करणारे राष्ट्र आहे.

श्री. रमेश शिंदे

मुस्लिम है हम सारा जहां हमारा, असे विधान करणार्‍यांची पूर्ण जगाला इस्लामी बनवण्याची मानसिकता लक्षात घ्यायला हवी ! – रमेश शिंदे

हिन्दी है हम हिन्दोस्तां हमारा असे म्हणणारे इक्बाल हे पुढे पाकिस्तानात गेले आणि तिथे त्यांनी मुस्लिम है हम सारा जहां हमारा, असे विधान केले. पूर्ण जगाला इस्लामी बनवण्याची मानसिकता लक्षात घ्यायला हवी. मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमणकर्त्यांचा गवगवा केला जातो. झेवियरने गोव्यात इन्व्किझिशनच्या नावाखाली  हिंदूंवर अत्याचार केले; मात्र त्याच्या नावाने शैक्षणिक संस्था चालू आहेत. ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्यास सांगायचे, सांताक्लॉजसारख्या खोट्या पात्रांना उभे करायचे, असे करून हिंदूंना भ्रमित केल्यावर आपसूकच त्यांचे धर्मांतर होते. हिंदू कुठे जाऊन कुणाचे धर्मांतर करत नाहीत. कोरोनामुळे युरोपीय देश हात जोडून अभिवादन करू लागले. विदेशी हे भारतीय संस्कृतीचे पालन करू लागले आहेत.

श्री. आनंद जाखोटिया

राम आमचे आराध्य, मग राममंदिरासोबत रामराज्य का नको ? – श्री. आनंद जाखोटिया

​वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदू विस्थापित झाले, तेव्हा स्वतंत्र भारतातील संसद, न्याययंत्रणा, प्रसारमाध्यमे सर्व शांत राहिले. त्यानंतर आज ठिकठिकाणी काश्मीर बनत आहेत. तमिळनाडूमध्ये १९ मासांत १२० हून अधिक मंदिरे आणि मूर्ती यांवर आघाताच्या घटना घडल्या. आजही बहुसंख्यांक हिंदूंच्या आस्थेविषयी अशा घटना होत असतील, तर आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी का करू नये ? जर देशाच्या राज्यघटनेनुसार सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक वर्षे संघर्ष केल्यावरही राममंदिर उभारणीला दगडफेक करून विरोध होणार असेल, तर हिंदूंना त्यांच्या संरक्षणासाठी रामराज्य का नको ?