३० टँकरद्वारे २७ गावे आणि २०८ वाड्या यांना पाणीपुरवठा
सातारा, २८ मार्च (वार्ता.) – मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे माण तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तालुक्यातील पाण्याची पातळी खालावली असून २७ गावे आणि २०८ वाड्या यांना प्रशासनाकडून ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये १० शासकीय, तर २० खासगी टँकर आहेत.
प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही मार्च मासामध्ये उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने टंचाईसदृश्य गावांमध्ये उपाययोजना चालू केल्या आहेत. यामध्ये माण तालुक्यातील पांगरी, येळेवाडी, पाचवड, मोही, बिजवडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, धुळदेव, संभूखेड, वरकुटे म्हसवड, भाटकी, कारखेल, खडकी, रांजणी, मार्डी या आणि इतर २०८ वाड्या-वस्त्यांचा सहभाग आहे. माण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात येणार्या पाणीपुरवठ्यावर ४३ सहस्त्र ९११ लोकसंख्या आणि २२ सहस्र २३८ पशूधन आहे. नागरिकांनी पाण्याचा उपयोग जपून करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.