कझाकिस्तानचा नागरिक भारतात सायबर गुलामगिरी फसवणूक केंद्रे उभारण्याच्या सिद्धतेत होता ! – अलोक कुमार, पोलीस महासंचालक

गोवा पोलिसांनी आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त केल्याचे प्रकरण

पोलीस महासंचालक अलोक कुमार

पणजी – संशयित तलानिती नुलाक्सी हा भारत, नेपाळ आणि शेजारील देश यांठिकाणी सायबर गुलामगिरीसाठी ‘कॉल सेंटर्स’ (कॉल सेंटर – ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूरभाष संपर्क (फोन कॉल) हाताळले जातात.) उभारण्याच्या सिद्धतेत होता, अशी माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला सायबर गुन्हे विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांचीही उपस्थिती होती. संशयित तलानिती नुलाक्सी सायबर गुलामगिरी फसवणूक केंद्रे उभारण्यासाठी बहुमजली इमारती शोधत होता, अशी माहिती माहिती या वेळी देण्यात आली.

सायबर गुन्हे विभागाने या प्रकरणी अदित्या रविचंद्रन् याला बेंगळुरू येथून, तर रूपनारायण गुप्ता याला मुंबई येथून कह्यात घेतले आहे. पोलीस महासंचालक अलोक कुमार पुढे म्हणाले, ‘‘संशयित नुलाक्सीजवळ विविध देशांची निवासी ओळखपत्रे मिळाली आहेत आणि यावरून या टोळीचे जागतिक स्तरावर जाळे असल्याचे स्पष्ट होते. ही टोळी भारतीय तरुणांना थायलंडमधील नोकर्‍यांचे आमीष दाखवून लाओस आणि म्यानमार येथील फसवणूक केंद्रांमध्ये नेऊन तस्करी करत होते. त्यांना तेथे आर्थिक सायबर फसवणूक आणि ‘हनी ट्रॅपिंग’ (महिलांद्वारे जाळ्यात अडकवणे) करण्यास भाग पाडले जात होते. ही टोळी भारतीय बँक खाती आणि सीम कार्ड भाड्याने घेऊन अनधिकृत कारवाया करत होती.’’ गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील एका युवकाची नुकतीच म्यानमार येथील सायबर फसवणूक केंद्रातून सुटका करण्यात आली.  या युवकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

विदेशी नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्यांची परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर खातरजमा करा !

पोलीस महासंचालक अलोक कुमार पुढे म्हणाले, ‘‘भारतीय युवकांनी विदेशी नोकरी स्वीकारण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर त्याविषयी प्रथम खातरजमा करून घ्यावी. गोवा पोलिसांनी विदेशी नोकर्‍या देणार्‍या संस्थांची नियमितपणे तपासणी करण्यास प्रारंभ केला आहे. आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याच्या प्रकरणाचे गोव्याशी धागेदोरे आहेत का ? याची पडताळणी केली जात आहे.’’