
कोल्हापूर, २८ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर येथील इंद्रजित सावंत यांना दूरभाष करून धमकी दिल्याचा आरोप असलेले नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी २५ मार्चला अटक केली आहे. कोरटकर यांची पोलीस कोठडी २८ मार्चला संपत असल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून कोरटकर यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ केली आहे.
गत वेळेस झालेला प्रकार पहाता न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकाची पडताळणी करूनच पोलीस न्यायालयात सोडत होते. असे असतांना सुनावणी झाल्यावर एका अधिवक्त्याने कोरटकर यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्या अधिवक्त्याला कोरटकर यांच्यापासून दूर नेले. आता ३० मार्चला परत कोरटकर यांना न्यायालयात उपस्थित करण्यात येईल.