नववर्ष म्हणजे एका पर्वातून दुसर्या पर्वामध्ये जाणे. आपल्या नववर्षाचा प्रारंभही विशिष्ट दिवशीच होतो. तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. त्या दिवशी निसर्गसुद्धा एका पर्वातून दुसर्या पर्वात जातो. हळूहळू थंडी ओसरून उन्हाळा चालू होतो, तसेच वातावरण प्रसन्न होत जाते. वसंत ऋतूचे आगमन असे होते आणि कोकिळेचे मधुर गीतही चालू होते. त्यामुळेच ‘कोयलिया बोले अंबुवा के डाल पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, नव कलियनपर गुंजत भवरा उनके संग करत रंग रलिया, यही बसंत की देत संदेसवा !’, ही मालकंस या रागातील एक सुप्रसिद्ध बंदिश (शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत) आहे. ज्याचा अर्थ असा होतो की, वसंत ऋतूच्या आगमनाविषयी स्वतः कोकिळा तिच्या मंजूळ स्वरांद्वारे संदेश देते. यातून आपल्याला लक्षात येते की, निसर्गात होणारा हा पालट हा पक्षांनाही लक्षात येतो.
कोकिळा हा असा पक्षी आहे, जो त्याच्या मंजूळ आवाजासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. इथे आपल्याला निसर्ग आणि संगीताला पुन्हा एकदा जोडता येते ! तसेच निसर्गामध्येही संगीत दडलेले आहे, हे आपण अनुभवू शकतो. प्रत्येक ऋतूचे एक वेगळे संगीत आहे. त्यामुळेच आपण म्हणू शकतो की, निसर्ग संगीत आणि अध्यात्म हे एकमेकांशी जोडलेले आहे. गुढीपाडवा हा तर आपला आनंदोत्सव. असे म्हणतात की, वर्षाच्या प्रथम दिवशी आपण एखादी चांगली कृती केल्यास वर्षभर आपण सातत्याने ती कृती करू शकतो, तर कोणत्याही क्षेत्रातील कलाकार अथवा व्यक्ती निसर्गातील संगीत अनुभवून ते अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा तर्हेने गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपण एक दिव्य संगीत संकल्पच करू ! अपार आनंद देणारा हा वसंत ऋतू आपल्याला नंतर घेऊन जातो तो नृत्यातून आनंद देणार्या आनंदाने नाचणार्या मोराकडे. पहा पुन्हा निसर्गामध्ये संगीत म्हणजेच नृत्य आले ! तसेच वसंत ऋतू नंतर वर्षा ऋतूचे आगमन होते आणि ‘मेघमल्हार’ हा राग कानांना मंत्रमुग्ध करतो. निसर्गाचे संगीत हे आध्यात्मिक आहे; कारण ते इतरांना आनंद देते. त्याचा कधीच कंटाळा येत नाही, तसेच निसर्गातील संगीताच्या सान्निध्यात राहिल्यावर आपले मन प्रसन्न रहाते. गुढीपाडव्यानिमित्त आजपासून कलाकार असो अथवा कुणीही त्या निसर्गातील संगीताचा आनंद घेऊन स्वतःचे जीवन त्याप्रमाणे आनंदी राहून इतरांना आनंद देण्याचे ध्येय घेऊया !
– कु. अपाला औंधकर, फोंडा गोवा.