पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे समाधीवर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी !

कोरेगाव भीमा (पुणे) – धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त शनिवारी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे समाधिस्थळी पूजाभिषेक, मूक पदयात्रा, शासकीय पूजा, कीर्तन, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, धर्मसभा, पुरस्कार वितरण, रक्तदान शिबिर आणि ‘छावा’ महानाट्यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला ‘धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती’चे कार्यवाह मिलिंद एकबोटे, अध्यक्ष सोमनाथ भंडारे, आदी उपस्थित होते.

धर्मसभेत श्रीक्षेत्र सरलाबेट येथील श्री रामगिरी महाराज यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सन्मानचिन्ह आणि ५१ सहस्र रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तसेच पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना ‘श्री शंभूतेज’ पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुधीर बाळसराफ, भारतीय कामगार सेना, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ आणि महेश भुईबार यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘शंभूसेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी नांदेडहून ३०० शंभूभक्त अनवाणी वढू येथे पोचणार आहेत. पुण्यतिथी कार्यक्रमास महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मंत्री उपस्थित रहाणार आहेत. ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ मालिकेचे निर्माते शेखर रघुनाथ मोहिते पाटील आणि अभिनेता अनुपसिंह ठाकूर यांना ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.