गुढीपाडव्याच्या निमित्ताने भारतियांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे) संकल्प करावा !

आमचा धर्म आणि संस्कृती उत्सव प्रिय. गुढीपाडव्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरामध्ये वेगवेगळे सण-उत्सव मोठ्या आनंदाने हिंदु संस्कृतीमध्ये साजरे केले जातात. वर्षारंभाचा पहिला उत्सव, म्हणजे चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा ! या उत्सवापासूनच आमच्या नवीन वर्षाचा प्रारंभ होतो आणि ऋतूचक्राप्रमाणे वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. अशोक, कुसुंब, बेल, पिंपळ, पळस आणि इतर झाडे यांना नवी कोवळी हिरवी पालवी फुटू लागते अन् वसंत ऋतूच्या आगमनाने आनंदित होऊन फळांचा राजा आंबा आपल्या मोहराने वातावरण सुगंधित करतो. कोकिळ हा पक्षी तर वसंताचा राजदूतच सृष्टीला त्याच्या आगमनाची सूचना देतो. नव्या पालवीने नटून थटून वृक्ष वनस्पती उत्सव साजरा करत असतांनाच जाई, जुई, मोगरा, शेवंती, चाफा आदी तरुवेलींवर सुगंधी पुष्पांचे घोष तरारून आलेले असतात आणि त्या फुलांचा सगळ्या वातावरणामध्ये भरून एक वेगळाच सुगंधोत्सव चालू असतो.

१. सध्याची स्थिती

आपली पृथ्वी २३.५ अंशाने कललेली असल्यामुळे या सृष्टीवर ऋतूचक्र निर्माण झाले. या सृष्टीवर प्रत्येक ऋतू, म्हणजे एक आगळावेगळा असा निसर्ग सोहळाच असतो. प्राचीन साहित्यातील या ऋतू उत्सवांची रसाळ वर्णने वाचतांना आपल्या पूर्वजांच्या रसिकतेची आणि निसर्ग सौंदर्याची जाणीव होते. आज आपले निसर्ग वा पर्यावरण यांपासून दुरावणेही अधोरेखित होते. आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात ऋतूंचे हे सोहळे अनुभवण्यासाठी वेळ मिळत नाही. दिवसा सिमेंटच्या जंगलात आणि रात्री घराच्या बंद दाराआड वसंत कधी येऊन जातो, हे आपल्याला कळतसुद्धा नाही अन् कोकिळेने घातलेली सुंदर अशी तान आपल्या कानापर्यंत पोचतच नाही.

२. गुढीपाडव्याच्या दिवशी असलेले वातावरण

श्री. अनिल दत्तात्रेय साखरे

गुढीपाडव्याचे आणखी एक वैशिष्ट्य, म्हणजे सहस्रो वर्षांपूर्वी आसुरी शक्तींचा नायनाट आणि लंकेच्या रावणाचा पराभव करून प्रभु श्रीरामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येत परत आले. प्रभु रामचंद्रांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या रांगोळ्या घालण्यासह रंगीबेरंगी पताका आणि धर्मध्वज उभारण्यात आले होते. यानंतर पुन्हा एकदा या भारत वर्षामध्ये रामराज्य अवतरले होते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला ‘गुढीपाडवा’ असे म्हटले जाते आणि महाराष्ट्रातील घराघरातून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच सनई चौघडा, तर कुठे मंगल वाद्यांचे स्वर घुमत असतात. महिला वर्ग घराबाहेर सुंदर रांगोळ्या काढत असतात, तर पुरुष वर्ग विजयाचे अन् मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारण्यामध्ये दंग असतात. त्या दिवशी नवीन दंड घेऊन यथोचित गुढीची विधीवत् पूजा केली जाते. या दिवशी प्रसाद म्हणून कडुनिंबाची पाने आणि साखर सर्वांना दिली जाते. यामध्ये थोडा आयुर्वेदाचाही विचार आमच्या ऋषिमुनींनी केलेला आहे. कडुनिंब हा आयुर्वेदात अनेक शारीरिक रोगांसाठी उपयोगी असा आहे. पुढे चालू होणार्‍या कडक उन्हाळ्यामध्ये आणि उष्णतेच्या विकारांसाठी कडुनिंबाची पाने फारच उपयोगी ठरतात; म्हणून या दिवशी कडुनिंबाचे सेवन करण्याचा प्रघात आहे. भारतीय कालगणनेमध्ये चंद्र आणि सूर्य या दोघांच्याही भ्रमणाचा अन् योगांचा मेळ घालून तिथी, वार, नक्षत्र, कृष्ण अन् शुक्ल पक्ष असा पंधरवडा अमावास्या, तसेच पौर्णिमा यांचा समन्वय साधून चैत्र ते फाल्गुन मास अशी निसर्गाशी समन्वय साधणारी अशी कालगणना केली जाते. शालिवाहन कालगणनेमध्ये प्रत्येक संवत्सराला वेगळे असे नाव असते आणि यावर्षीच्या संवत्सराचे नाव आहे ‘विश्वावसूनाम’ संवत्सर शालिवाहन शके १९४७ !

३. भारतियांनी करावयाचा संकल्प

आजच्या भांडवलशाही बाजारपेठांत अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघितले, तर गुढीपाडवा हा पुष्कळ मोठा उत्सव ठरतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवनवीन वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जाते.  भूमी, सोने, चांदी, घर, वाहन, गृहसजावटीचा वस्तू, मनोरंजनाची साधने आदींची खरेदी केली जाते, तर कुठे नव्या उद्योग व्यवसायाचा प्रारंभ केला जातो. सध्या अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढल्या जातात, ज्यामुळे एक वेगळीच वातावरण निर्मिती होते. सहस्रो वर्षे प्राचीन महान अशा वैदिक संस्कृतीची विशाल परंपरा असलेल्या भारतियांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे) संकल्प करावा !

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व). (२४.३.२०२५)