हिंसाचार करणारे सगळे एकाच धर्माचे कसे ? – मंत्री नितेश राणे 

उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका

पालकमंत्री नितेश राणे

कणकवली – हिंदुत्वाच्या सूत्रावरून शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत; पण भगव्याचा द्वेष करणार्‍या आणि हिरव्याचे लांगूलचालन करणार्‍या ठाकरे यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यात आणि देशात हिंसाचार करणार्‍यांमध्ये सगळे एकाच धर्माचे कसे ? आणि त्याविरोधात आम्ही आवाज उठवला, तर आम्ही चुकीचे कसे ठरू शकतो ? असे प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की,

१. देशात आणि महाराष्ट्र राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. सर्व हिंसाचारांमधील आरोपी हे एकाच धर्माचे आहेत. त्यामुळेच आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहोत. आम्हाला हिंदुत्व शिकवणार्‍यांनी कधी त्या धर्मातील उन्मादींना राज्यघटना शिकवली आहे का ? त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे का? हे आधी पहावे.

२. भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग काढण्याची मागणी उद्धव ठाकरे करत आहेत; पण आमच्या पक्षाचा झेंडा कसा दिसावा याची चिंता त्यांनी करू नये; कारण आता भगवा आणि ठाकरे यांचा काहीही संबंध राहिलेला नाही.

३. मुख्यमंत्री राहिलेल्या ठाकरे हे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्यावरून टीका करत आहेत. संसदेमध्ये विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेत विरोधी पक्षनेता नव्हता. तशीच स्थिती महाराष्ट्रातही आहे; परंतु ठाकरे यांना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही.

४. जिल्हा परिषदेचा निधी खर्च करण्यामध्ये काही अधिकार्‍यांनी थोडा कंटाळा दाखवला, योग्य नियोजन केले नाही; पण त्यांना आम्ही समज दिली असून कारवाई केली आहे. ज्या गोष्टी शासनाच्या चौकटीत बसत नव्हत्या. त्यामध्ये आम्ही सुधारणा करून निधी योग्य पद्धतीने खर्च केला. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही योग्य नियोजन केले आहे.