आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त

  • गोवा सायबर गुन्हे विभागाची धडक कारवाई   

  • चिनी आणि भारतीय नागरिकांना घेतले कह्यात

पणजी, २७ मार्च (वार्ता.) – गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी गोव्यातील सायबर गुन्हे विभागाने आदित्य रविचंद्रन् (वय २२ वर्षे, तमिळनाडू), रूपनारायण गुप्ता (वय ३६ वर्षे, मुंबई) आणि तालानीती नुलाक्सी (वय २२ वर्षे, मूळचा चीनमधील आणि आता रहाणारा कझाकिस्तान) यांना कह्यात घेतले आहे. तिसवाडी येथील एका पीडित युवकाची म्यानमार येथून फेब्रुवारी महिन्यात सुटका करण्यात आली होती. त्यानंतर गोवा सायबर गुन्हे विभागाने पीडित युवकाची साक्ष नोंदवल्यानंतर या प्रकरणी अन्वेषणाला प्रारंभ केला. या अन्वेषणानंतर आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळा उघडकीस येऊन त्यावर कारवाई झाली.

थायलंडमधील एका ‘कॉल सेंटर’मध्ये (कॉल सेंटर – ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूरभाष संपर्क (फोन कॉल) हाताळले जातात.) नोकरी असल्याचे विज्ञापन ‘इस्टाग्राम’वर प्रसिद्ध झाले होते. या विज्ञापनात संबंधित दलालाने मासिक ६० सहस्र रुपये वेतन मिळणार असल्याचे म्हटले होते. या नोकरीसाठी पीडित युवकाने संबंधित दलालाला संपर्क केला आणि दलालाने त्याला १४ जानेवारी या दिवशी थायलंड येथे नेले. १५ जानेवारी या दिवशी थायलंड येथे पोचल्यानंतर पीडित युवकाला एका नौकेतून म्यानमार येेथे नेण्यात आले. पीडिताला मान्यमार येथे ‘कॉल सेंटर’मध्ये नेण्यात आले. ‘कॉल सेंटर’मधून भ्रमणभाषवरून अमेरिकन नागरिकांना युवती असल्याचा संदेश पाठवून ‘हनी टॅ्रप’मध्ये ओढून त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडणे, असे दायित्व पीडित युवकाला देण्यात आले. त्यानंतर म्यानमारमधील सैन्याने संबंधित ‘कॉल सेंटर’मधील पीडितांची सुटका केली. गोव्यातील सायबर गुन्हे विभागाने पीडित युवकाचे अन्वेषण करत नोकरभरती घोटाळा उघडकीस आणला. या प्रकरणी भारतातील अन्य एक नागरिकाचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्याचा शोध चालू आहे.