मराठी राजभाषा करून ऐतिहासिक कार्य करावे ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

प्रा. सुभाष वेलिंगकर

म्हापसा, २८ मार्च (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाने भराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन जसे ऐतिहासिक कार्य केले आहे, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन ऐतिहासिक कार्य करावे, असे आवाहन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. विद्याभारती गोवा संचालित गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालय, शिवोली येथील श्री शांता विद्यालय, कामुर्ली येथील पिपल्स विद्यालय आणि सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर अन् श्री सातेरी प्राथमिक विद्यामंदिर या विद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी हे आवाहन केले. ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’चे निमंत्रक असलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ‘मराठी राजभाषा का झाली पाहिजे ?’, या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या वेळी ३१ मार्च या दिवशी पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणार्‍या निर्धार मेळाव्यात उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. या वेळी विद्याभारतीचे कार्याध्यक्ष तथा समितीचे सदस्य प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनीही महत्त्वाच्या सूत्रांवर मार्गदर्शन केले. समारोपीय भाषणात प्राचार्य गजानन मांद्रेकर म्हणाले, ‘‘निर्धार मेळावा हा वाद नसून कोकणी भाषेबरोबरच मराठी भाषेलाही राजभाषेजा दर्जा मिळावा, अशी मागणी याद्वारे सरकारकडे आपण सर्व करत आहोत.’’ या वेळी व्यासपिठावर विद्या भारती गोवाचे संघटनमंत्री पुरुषोत्तम कामत आणि कार्यकारिणी सदस्य शशांक कामत यांची उपस्थिती होती. या मार्गदर्शन सत्रास श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संदीप पाळणी, श्री शांता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रजिता सांगाळे आणि पिपल्स विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय सामंत, तसेच सर्व विद्यालयांचे ८० शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने करण्यात आली.