मालमत्ताकराची ६०० कोटी रुपयांची वसुली
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने करवसुलीची धडक मोहीम राबवून अद्यापपर्यंत ६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती उपायुक्त शरद पवार यांनी दिली. (एवढी कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित ठेवणार्यांचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक)
मालमत्ता कर, नगररचना कर, पाणीपट्टी, एल्.बी.टी.च्या ऐवजी शासनाकडून मिळणारे अनुदान आदी कर हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. मालमत्ता करवसुलीसाठी जानेवारीपासून विशेष मोहीम घेण्यात आली. यामध्ये मोठे थकबाकीदार असलेल्या मालमत्ताकरधारकांना नोटिसा बजावणे. या नोटीसीनंतरही त्यांनी मालमत्ताकर न भरल्यास पुढे त्यांची नळजोडणी खंडित करणे, मालमत्ता अटकावणी करणे, आदी प्रकारे प्रभावीपणे कारवाया करून मालमत्ताकर वसुलीकरिता प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आतापर्यंत ४५४ हून अधिक मालमत्ताकरधारकांच्या मालमत्ता अटकावणी करण्यात आल्या. त्यांच्याकडून ४० कोटी रुपये अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत १७ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
महापालिका क्षेत्रात एकूण ३ लाख ४५ सहस्र मालमत्ता आहेत. यामध्ये रहिवासी वापर असलेल्या २ लाख ६८ सहस्र, ५२ सहस्र वाणिज्य आणि उर्वरित औद्योगिक मालमत्ता आहेत. वाशी येथे विविध राज्यांची भवने आहेत. यातील काही राज्यांच्या भवनांकडून अनेक वर्षे कर मिळत नव्हता. त्यामुळे त्यांची थकबाकी वाढली होती. यावर्षी कर निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकार्यांनी सातत्याने या राज्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत कर भरण्याकरिता पाठपुरावा केला. त्यामुळे गोवा, पंजाब, ओडिसा, मध्यप्रदेश या राज्य सरकारांच्या माध्यमातून सुमारे २० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कर वसूल झाला आहे. |
वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर विभागाला ९०० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी अद्यापपर्यंत ६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल करण्यात मालमत्ताकर विभागाला यश आले आहे. वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १ सहस्र २०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. १ लाख रुपयांहून अधिक रकमेचे थकबाकीदार असलेले १ सहस्रांहून अधिक मालमत्ताधारक आहेत.
त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या लोकअदालतमध्ये १३९ जणांनी २ कोटी ७५ लाख रुपयांचा कर भरला आहे. १ सहस्र ६८५ थकबाकीदारांना लोकअदालतीच्या नोटिसा बजावल्या होत्या. प्रशासनाला या थकबाकीदारांकडून ४१ कोटी रुपये येणे अपेक्षित होते.
संपादकीय भूमिका :कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवणार्या प्रशासनावर कुणाचा अंकुश नसणे हे दुर्दैवी ! |