पाटण (सातारा) येथील मुख्य जलवाहिनी फुटल्याने ३ दिवसांत सहस्रो लिटर पाणी वाया !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २८ मार्च (वार्ता.) – पाटण शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला गत ३ दिवसांपासून गळती लागल्यामुळे आतापर्यंत सहस्रो लिटर पाणी वाया गेले आहे. नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला याविषयी माहिती देऊनही गळती काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. पाटण नगरपंचायत प्रशासनाने ही गळती काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. गंजलेली पाईपलाईन पालटून नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जलवाहिनी गंजल्यामुळे अनेक घरांमध्ये नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना कोयना नदीवरून पाणी आणावे लागत आहे किंवा टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहेत.

लवकरात लवकर गळती काढण्याचे काम चालू करण्यात येईल, अशी माहिती पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत यांनी दिली आहे. (हे अगोदर का झाले नाही ? नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठीही प्रतिदिन त्रास सहन करावा लागणे, हे अपेक्षित नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

जलवाहिनी फुटल्यानंतर त्याची दुरुस्ती करायला ३ दिवस का लागतात ? वाया गेलेल्या पाण्याचे दायित्व कुणाचे ?