आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

वढू (बुद्रुक) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी लावलेल्या फलकावरील लिखाण.
।। जय श्रीराम ।।
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे रामसिंहास लिहिलेले पत्र
‘त्या यवनाधमाला (औरंगजेबास) सांप्रत असे वाटू लागले आहे की, आम्ही हिंदू तत्त्वशून्य झालो आहोत, आम्हाला आमच्या धर्माचा काहीही अभिमान राहिलेला नाही. बादशाहची वागणूक यापुढे आम्हाला सहन होणार नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. वेद, श्रुति-स्मृति इत्यादींनी धर्म आणि जाती यांच्या संबंधीची कर्तव्ये नेमून दिलेली आहेत. त्यांची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही. राजे म्हणून प्रजापालनाचा आमचा जो धर्म आहे, तो आम्ही टाकू शकत नाही. या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग सर्व काही पणास लावावयास तयार आहोत. या दृढ उद्देशाने आम्ही गेली २ वर्षे अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आमच्या देशात आश्रय दिला आहे. आम्ही यवनाधिपतीच्या अनेक सेनानायकांची हत्या केली. कित्येकांना कारागृहात टाकले, काहींना खंडणी घेऊन, तर काहींना दयाबुद्धीने सोडून दिले. काहींनी लाच चारून आपली सुटका करून घेतली. अशा रितीने बादशाहचे सेनानायक हे बिनकामाचे ठरले आहे. आता अशी वेळ आली आहे की, त्या यवनाधमाला (औरंगजेबाला) पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकर्मे निर्विघ्नपणे पार पडतील, अशी व्यवस्था करता येईल. हे सारे लवकर करावयाचे आम्ही ठरवले आहे, याची आपण खात्री बाळगावी.

‘पठाणाधिप’ (इराणचा) शहा अब्बास याने आपण अकबराला साहाय्य करू’, असे लिहिले आहे; परंतु याबाबतीत आपण यवनांची मदत घ्यावी आणि यशाचे श्रेय त्यांना मिळवून द्यावे, हे मला अनुचित वाटते. आपले पिता (राजा जयसिंग) यांनी यवनाधमाला दिल्लीश्वर करून त्याचे श्रेय संपादन केलेच ना ? त्याप्रमाणे आपणही अकबराला मदत करून यशाचे धनी व्हावे. यवनांच्या मदतीने अकबराला राज्यपद लाभले, तर त्यांना प्राधान्य येईल. ही गोष्ट आपण घडू देऊ नये. आपण उभयतांनी एक होऊन अकबराला गादीवर बसवले, तर धर्मरक्षणाचे कार्य होईल आणि आपल्या या कार्याने महाराजा जयसिंह यांच्या वंशाला शोभा येईल ?
– शिवपुत्र संभाजी’
वरील पत्र आजही जयपूर वस्तूसंग्रहालयामध्ये (राजस्थान) वाचवयास मिळते.
– श्री. भरत आमदापुरे, अभियंता, पुणे. (१८.३.२०२५)