
मुंबई – कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर आंबिवली रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीत आतापर्यंत १० ते १२ वेळा पोलिसांवर जीवघेणे आक्रमण झालेले आहे. रॉकेल ओतून पोलिसांचा जीव घेण्याचा प्रकार झाला, दगडफेक झाली, महिलांआडून गुन्हेगारांना पळून जाण्यास साहाय्य करण्यात आले आहे. एकटा दुकटा पोलीस या वस्तीत जाऊ शकत नाही. इराणी टोळीला कायद्याची भीती आणि वर्दीचा धाक राहिलेला नाही. कुख्यात गुंडांचे निवासस्थान, लपण्याची जागा म्हणून इराणी वस्ती ओळखली जाते. महाराष्ट्र पोलीस आणि सरकारला आव्हान देणार्या या इराणी वस्तीची दहशत मोडून काढावी, अशी मागणी २६ मार्चला भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत सरकारकडे केली. (कायद्याच्या रक्षकांवरच सातत्याने आक्रमणे होत आहेत, ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद ! इराणी वस्तीची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, ही जनतेची अपेक्षा ! – संपादक) यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या संपूर्ण वस्तीत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ (धरपकड मोहीम) केले जाईल, असे सांगितले.