हिंदु जनजागृती समिती आयोजित ऑनलाईन चर्चासत्र ‘चर्चा हिंदु राष्ट्राची ।
पुणे – शहरी नक्षलवाद आणि इस्लामी जिहादी आतंकवादी यांची अभद्र आघाडी देहली, बेंगळुरू येथे पहायला मिळाली. लोकशाही कह्यात घेणे, देशविरोधी आणि हिंदु धर्मविरोधी घोषणा देणे, शेतकरी आंदोलनांना भडकवणे, इस्लामी राष्ट्र निर्मितीसाठी फेसबूकवरून प्रसार करणे, विद्यापिठांतील प्राध्यापकांनी दंगली घडवण्याचे प्रशिक्षण देणे अशा अनेक घटना देशाने पाहिल्या. जिहादी आतंकवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्या अभद्र आघाडीचे नवी देहली हे प्रयोगकेंद्र झाले आहे. हाच प्रयोग बेंगळुरूमध्ये करण्यात आला.
या सर्व घटनांविषयी आपल्याला सतर्क रहायला हवे. देशातील विविध शहरांमध्ये असे प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. जगामध्ये कुठेही असलेला हिंदु जर पीडित असेल, तर त्याला मायभूमी म्हणून भारतात परत येता यायला हवे, असे प्रतिपादन नवी देहली येथील माजी आमदार श्री. कपिल मिश्रा यांनी केले. ‘सीएए’ (नागरिकता सुधारणा कायदा) आणि ‘एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) झाल्यावर झालेल्या कार्याचा वर्षभराचा आढावा घेण्यासाठी ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या कार्यक्रमात ‘सीएए – एन्.आर्.सी.’च्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन’ या विषयावर नुकतीच चर्चा घेण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘मानुषी’ संस्थेच्या संस्थापक संपादिका प्रा. मधु पूर्णिमा किश्वर, पीडित पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्यरत असलेले राजस्थान येथील ‘निमित्तेकम्’चे अध्यक्ष श्री. जय आहुजा, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे उपस्थित होते. समितीचे श्री. सतीश कोचरेकर आणि श्री. प्रशांत जुवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
देशाच्या विरोधात चालू असलेल्या ‘माहिती युद्धा’ला आपण जिंकणे आवश्यक ! – रमेश शिंदे
१. कलम ३७० रहित करण्याची प्रक्रिया चालू झाल्यापासून देहलीसारख्या दंगलींचे नियोजन होत आहे. काश्मिरी हिंदू किंवा त्यांचे अधिकार यांसाठी कुणीही बोलत नाही. प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांच्या अधिकाराविषयीच बोलले जाते.
२. ‘सीएए’, ‘एन्.आर्.सी.’ यांद्वारे सरकार हिंदु राष्ट्राच्या दिशेने जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यातून हिंदु राष्ट्र म्हणजे काही तरी भयंकर असल्याचा प्रचार केला जात आहे; मात्र हे कायदे करण्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामवर आधारित देशच कारणीभूत आहेत. तेथील अल्पसंख्याकांवर होणार्या आक्रमणांचे वास्तव जगभरात ज्ञात आहे.
३. शेतकरी आंदोलनात शेतकर्यांच्या हिताची नव्हे, तर खलिस्तानची मागणी केली जात आहे. देशातील दंगलखोरांना पाठिंबा देण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संघटनेचा प्रमुख हात आहे.
४. केरळमधील मार्क्सवादी नेत्यांनी ‘या संघटनेद्वारे लव्ह जिहाद केला जाऊन केरळचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे’, असे म्हटले होते. याविषयी कुणीही बोलत नाही. अशा देशविघातक शक्तींना भारतात एन्.आर्.सी.चे आंदोलन असो किंवा आताचे शेतकरी आंदोलन असो, यातून अराजक माजवायचे आहे. सीएएच्या समर्थनार्थ एकाही संकेतस्थळावर माहिती मिळणार नाही. या माध्यमांतून ‘माहिती युद्ध’ चालू असून तेसुद्धा आपण जिंकणे आवश्यक आहे.
‘सीएए’ राज्यांमध्ये लागू झाल्यानंतरच परिवर्तन होईल ! – जय आहुजा
‘सीएए’ झाल्यामुळे १९५५ च्या कायद्यामधील पाकिस्तानसह अन्य देशांतील अल्पसंख्यांक जे लाभार्थी होते, तेच आज लाभार्थी आहेत. त्यामुळे हा कायदा मुसलमानविरोधी असल्याचे खोटे पसरवले जात आहे. ‘एन्.आर्.सी.’वर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला; पण ‘सीएए’ अद्याप देशांतील सर्व राज्यांमध्ये लागू झालेला नाही. हा कायदा राज्यांमध्ये लागू झाल्यानंतर परिवर्तन होऊ शकते. ‘सीएए’ मुळे सहस्रो शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे.
हिंदू राष्ट्रविहीन असल्याने त्यांना स्वत:चे राष्ट्र मिळायलाच हवे ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्वर
१. आज आपण माहिती युद्धामध्ये मागे पडलो आहेत. सामाजिक माध्यमांतून सत्य बाहेर आल्याने प्रसिद्धीमाध्यमांनाही सत्य दाखवावे लागले.
२. देशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ शकते, तर हिंदु राष्ट्र का नाही ? प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांनीच का ठरवायचे की, देशाने कोणत्या दिशेला जायला हवे ? हिंदूंनी आपल्यासाठी विचार करू नये का ? भारताचे कर्तव्य आहे की, सहस्रो वर्षे प्राचीन असलेल्या हिंदु संस्कृतीचे रक्षण करायला हवे.
३. हिंदूंचे कायदे उद्ध्वस्त करून पश्चिमी, तसेच अन्य कायदे लादण्यात आले. हिंदू राष्ट्रविहीन असल्याने त्यांना स्वत:चे राष्ट्र मिळायलाच हवे.
विशेष
हा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमांतून ४६ सहस्र १६६ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर १ लाख ४६ सहस्र २०४ लोकांपर्यंत कार्यक्रम पोचला (रिच).