छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश !

मंदिरासह सिंधुदुर्ग गड आणि परिसराचा विकास करण्याची मागणी !

डावीकडून उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना समितीचे श्री. सतिश सोनार, श्री. रवि नलावडे आणि शिवसेनेचे आमदार श्री. आनंद बोंडारकर

मुंबई, २८ मार्च (वार्ता.) – क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये खर्च होत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुटपुंजे अर्थसाहाय्य करणे, हा अन्याय आहे, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. या मागणीवर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महसूल विभागाच्या सचिवांना (श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी) प्रतिमहा ५० सहस्र रुपये निधी वाढवून देण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचा लिखित आदेश दिला. तसेच महसूल विभागाच्या सचिवांना दूरभाष करून मंदिरासाठी प्रतिमहा २५० रुपयांऐवजी ५० सहस्र रुपये देण्याचाही स्पष्ट आदेश दिला. या वेळी शासनाचे साहाय्य मिळण्याआधी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने वैयक्तिकरित्या महाराजांच्या मंदिरासाठी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य करून एक चांगला पायंडाही पाडला, तसेच त्यांनी नियमितपणे मंदिरासाठी निधी घेऊन जाण्यासही सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाविषयी त्यांचे आभार मानण्यात आले.

या प्रसंगी समितीच्या वतीने श्री. सतीश सोनार, श्री. रवि नलावडे आणि नांदेड येथील शिवसेनेचे आमदार श्री. आनंद बोंडारकर उपस्थित होते. केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात वर्ष २०१२ पासून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी निधी देणे चालू करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने  औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी ६ लाख ५० सहस्र रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करता औरंगजेब हा एक क्रूर आक्रमक होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या केली. असा आक्रमक आदरास पात्र नाही आणि त्याच्या कबरीच्या देखभालीसाठी निधी खर्च करणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणारे आहे. त्यामुळे हा निधी सरकारने बंद करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी समितीने केली.

शिवप्रेमींसाठी सिंधुदुर्ग गडाचा विकास करा !

छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत: मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एकमेव आणि प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे येथे लाखो शिवप्रेमी आणि पर्यटक येतात. गडावर बोटीने यावे लागते. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांची सोय करणे आवश्यक आहे. गड मोठा असल्यामुळे झाडी-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्या हटवून गडाचे सुशोभीकरण करणे, परिसरात सुंदर बगीचा सिद्ध करणे, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह आणि गोड्या पाण्याच्या विहिरीचे सुशोभीकरण करणे यांसारखी अनेक विकासकामे तातडीने व्हावीत, अशाही मागण्या उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.