काँग्रेसच्या खासदाराच्या विरोधातील गुन्हा केला रहित
नवी देहली – निरोगी लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने व्यक्त केलेल्या विचारांना दुसरा दृष्टीकोन मांडून विरोध केला पाहिजे. बहुसंख्य लोकांना दुसर्याने व्यक्त केलेला विचार रुचला नसला, तरी त्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे. निरोगी समाजात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. कविता, नाटक, चित्रपट, व्यंगचित्र, कला यांसह साहित्य मानवी जीवनाला अर्थपूर्ण बनवतात. या माध्यमातून व्यक्त होण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नागरिकांना असायलाच हवे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सर्वोच्च न्यायालयाने कवी आणि काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधात गुजरात पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रहित केला. ‘विचार आणि विचारांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याविना राज्यघटनेने कलम २१ अंतर्गत हमी दिलेले सन्मानाने जीवन जगणे अशक्य आहे’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
इम्रान प्रतापगढी यांनी सामाजिक माध्यमांतून ‘ऐ खून के प्यासे, बात सुनो’ ही कविता प्रसारित केली होती. यावरून त्यांच्या विरोधात गुजरात पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.