Kathmandu Demands Hindu Rashtra :  काठमांडू (नेपाळ) येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन !

  • राजा ज्ञानेंद्र यांच्याकडे सत्ता देण्याची आंदोलकांची मागणी

  • मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याची चेतावणी

  • भारताने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास दिला नकार

नेपाळमध्ये आंदोलन

काठमांडू – नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना यांसाठी हिंदूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. या वेळी झालेल्या हिंसाचारात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात एक तरुण घायाळ झाला. या प्रकरणी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ही एका देशाची अंतर्गत घटना असल्याने आम्ही त्यावर भाष्य करणार नाही.

१. देशात फोफावलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि वारंवार होणार्‍या सत्तापालटामुळे नेपाळमधील जनता त्रस्त झाली आहे. त्यातून ते राजेशाहीची आणि हिंदु राष्ट्राची मागणी करत आहेत. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेकडून पाठिंबा मागितला होता. तेव्हापासून देशात ‘राजा परत आणा, राष्ट्र वाचवा’ चळवळीची सिद्धता चालू होती.

२. या आंदोलनात ४० हून अधिक नेपाळी संघटनांनी भाग घेतला. ‘राजा, देश वाचवा’, ‘भ्रष्ट सरकार मुर्दाबाद’ आणि ‘आम्हाला राजेशाही परत हवी आहे’ अशा घोषणा आंदोलक देत होते. आंदोलकांनी सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. जर त्यांच्या मागण्यांवर कारवाई झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

३.  या आंदोलनाचे नेतृत्व ८७ वर्षीय नवराज सुवेदी करत आहेत. नवराज सुबेदी म्हणाले की, आम्ही आमच्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडत आहोत; परंतु जर आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्हाला निदर्शने तीव्र करण्यास भाग पाडले जाईल. आमचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील.