Sikh Immigrants Turbans : शीख स्थलांतरितांना पगडी काढायला लावली नाही ! – अमेरिकेचे स्पष्टीकरण

नवी देहली – भारतीय निर्वासितांना परत पाठवतांना वाईट वागणूक दिल्याच्या आरोपांवर अमेरिकेने उत्तर दिले आहे. शीख स्थलांतरितांना पगडी काढायला लावली नाही. तसेच महिला आणि लहान मुले यांना बेड्या घातल्या नव्हत्या, असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी दिले आहे.

अमेरिकेत अवैध प्रवेश केलेल्या स्थलांतरितांच्या विरोधात गेल्या महिन्यात ट्रम्प प्रशासनाने कठोर कारवाई केली होती. अमेरिकी सैन्यदलाच्या ३ विमानांतून अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या शेकडो भारतियांना मायदेशी परत पाठवण्यात आले होते. या वेळी भारतीय नागरिकांना विमानात वाईट वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर भारत सरकारने याविषयी औपचारिक स्वरूपात चिंता व्यक्त केली होती. शीख निर्वासितांना त्यांची पगडी काढायला लावल्याचा, तसेच महिला आणि लहान मुले यांना बेड्या घातल्याचा वृत्तांविषयी भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.

शीख निर्वासितांना त्यांची पगडी काढायला लावल्याचा आरोप

भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेला अमेरिकी अधिकार्‍यांनी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी संबंधित सूत्रे स्पष्ट केली, तसेच विमान प्रवासाच्या वेळी निर्वासितांना केवळ शाकाहारी जेवण देण्यात आले, असेही सांगितले.