बंदी घालण्यात आलेल्या ‘ब्लू व्हेल’ खेळावरून मुलाला सुचली जीवघेणी संकल्पना

कर्णावती (गुजरात) – राज्यातील अमरेली जिल्ह्यातील मोटा मुंजियासर गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांना ब्लेडने हात कापण्याचे काम नेमून दिले होते. प्रारंभी त्याच्या वर्गातील अनुमाने १० मुले त्यात सहभागी झाली आणि नंतर इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतची ४० मुले यात सहभागी झाली. ४० मुलांनी विविध वस्तूंचा वापर करून स्वतःच्या हातावर जखमा केल्या. हे सर्व विद्यार्थी पाचवी ते आठवी इयत्तेत शिकत आहेत. संबंधित विद्यार्थ्याला ‘ब्लू व्हेल’ हा व्हिडिओ खेळ खेळून असे काम देण्याची कल्पना सुचली.
१. ‘ज्याच्या हातावर अधिक जखमा असतील, त्याला १० रुपये बक्षीस दिले जाईल आणि त्यानेच नियोजित काम पूर्ण केले’, असे समजले जाईल’, असे या मुलाने अन्य मुलांना सांगितले.
२. काम पूर्ण करणार्या मुलाला १० रुपये बक्षीस दिले जाईल. जर एखादा विद्यार्थी काम पूर्ण करू शकला नाही, तर त्याला अन्यांना ५ रुपये द्यावे लागतील.
३. पोलिसांच्या चौकशीत असे आढळले की, विद्यार्थ्यांना काम नेमून देणारा विद्यार्थी शाळेत भ्रमणभाष घेऊन येतो आणि अनेकदा घरी ऑनलाइन खेळ खेळतो.
शाळेतील शिक्षकांनी दायित्व झटकले !
जेव्हा मुलांच्या हातांवर जखमा पाहून गोंधळ उडाला, तेव्हा प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, ही पालकांची चूक आहे. शिक्षकांच्या मते ‘पालक मुलांना भ्रमणभाष वापरण्याची अनुमती देतात. मुले त्यावर कोणता खेळ खेळत आहेत किंवा काय पहात आहेत ?, याकडेही ते लक्ष देत नाहीत. मुलांना भ्रमणभाषच्या व्यसनापासून मुक्त करण्याचे दायित्व शिक्षकांचे नाही, तर पालकांचे आहे.’
भारतात ब्लू व्हेल खेळावर बंदी !
भारतात ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाईन खेळावर सरकारने वर्ष २०१७ मध्ये बंदी घातली होती. या खेळाला ‘आत्महत्या करायला उद्युक्त करणारा खेळ’ असेही म्हणतात. वर्ष २०१५ ते २०१७ या कालावधीत हा खेळ खेळणार्या अनेकांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या खेळामध्ये ५० टप्पे आहेत, जे हळूहळू अधिक कठीण होत जातात. हा खेळ खेळणार्याला ५० दिवसांच्या कालावधीत प्रतिदिन नवीन कामे दिली जातात. आरंभीला दिलेली कामे सोपी असतात; परंतु शेवटच्या टप्प्यात ती अधिकाधिक कठीण होतात, ज्यामध्ये स्वतःला हानी पोहोचवणे आणि सहभागी झालेल्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणे, यांचाही समावेश असतो.
संपादकीय भूमिकाभारतात बंदी घालण्यात आलेला ऑनलाईन खेळ मुले पहातात कशी ? मुलांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे ! |