Ajmer Dargah ASI Survey : अजमेरचा दर्गा पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याने तेथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करा !

  • राजस्थानमधील हिंदु संघटनांची मुख्यमंत्री भजनलाल यांच्याकडे मागणी !

  • दर्ग्याकडून हिंदु संघटनांच्या विरोधात तक्रार !

दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात

जयपूर (राजस्थान) – अजमेर येथे असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्‍ची दर्गा म्हणजे अजमेर दर्गा येथे पूर्वी हिंदु मंदिर होते. त्यामुळे या ठिकाणाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (‘ए.एस्.आय.’कडून) सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराणा प्रताप सेना आणि हिंदु शक्ती दल या संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना पत्र लिहून सर्वेक्षणाची मागणी केली आहे. याखेरीज सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात !

महाराणा प्रताप सेनेचे अध्यक्ष राज्यवर्धन सिंह परमार म्हणाले की, ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.

दर्गा दिवाण आणि खादिम यांनी तक्रार नोंदवली !

या प्रकरणी दर्ग्याचे दिवाण जैनुअल अबेदिन यांचा मुलगा सय्यद नसीरुद्दीन चिश्ती याने दर्गा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. तसेच धार्मिक भावना भडकावण्याचे प्रयत्न थांबवण्याची मागणी करत दर्ग्याचे खादिम (सेवेकरी) शकील अब्बासी यांनी अजमेरच्या क्लॉक टॉवर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दर्गा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी नरेंद्र जाखड म्हणाले की, नसीरुद्दीन याने दिलेल्या तक्रारीनुसार हिंदु शक्ती दल या संघटनेने दर्ग्याला मंदिर म्हणत धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.

हे प्रकरण अल्पसंख्यांक आयोगापर्यंत पोचले आहे. आयोगाने या प्रकरणाचा अजमेर जिल्हा प्रशासनाकडून आठवडाभरात अहवाल मागवला आहे. खादीमांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन दर्ग्याविषयी केल्या जाणार्‍या टिप्पणीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.