श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची समाजकंटकांवर कठोर कारवाईची निवेदनाद्वारे मागणी !
मिरज (जिल्हा सांगली), २८ मार्च (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणारा समाजकंटक रामचंद्र चव्हाण (रा. वखारभाग, मिरज) याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून त्याला अटक करावी, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विनायक माईणकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना दिले. या प्रकरणी पोलिसांनी समाजकंटक रामचंद्र चव्हाण याला कह्यात घेतले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट सामाजिक माध्यमांवर फिरत आहे. समाजकंटक रामचंद्र चव्हाण याने गुरुजींचे चित्र विचित्र पद्धतीने पोस्ट करून सर्व धारकर्यांच्या भावना दुखावल्या आहेत. हा प्रकार वेळीच रोखावा. गुरुजींवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्या सर्व समाजकंटकांवर कारवाई कारावी. त्याच्या अटकेची बातमी पोलिसांकडून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करावी, जेणेकरून पुन्हा अशी पोस्ट प्रसारित करण्याचे अन्य कुणाचे धाडस होणार नाही.
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित ! |