
महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनातील छत्रपतींचे स्थान अत्यंत गौरवाचे आणि अभिमानाचे आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा लाभलेला प्रत्येक हिंदु स्वतःला ‘शिवरायांचा मावळा’ म्हणवून घेण्यास कोणतीही लाज बाळगत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना अन् रक्षण यांसाठी दाखवलेला पराक्रम हिंदूंच्या रक्तात भिनलेला आहे. त्यामुळेच औरंगजेबाच्या स्मृतीस्थळाला उद्ध्वस्त करण्याची मागणी आजच्या मावळ्यांनी जोरदारपणे लावून धरली; पण औरंग्याची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी अचानकपणे सगळीकडून अल्प होऊन मध्येच वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी वादंग निर्माण झाला आणि क्रूरकर्म्या औरंग्याच्या कबरीच्या विषयाला फाटा फुटला. आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीला उद्ध्वस्त करण्याची मागणी करण्यापाठोपाठ, तो अस्तित्वात होता कि नव्हता ? हे पात्र कुणी निर्माण केले ? पुतळा उभारून शिवरायांचा अवमान करण्यात ब्राह्मणांचा हात कसा होता ? छत्रपती शाहू महाराज आणि होळकर घराणे यांच्यातील संबंध, त्याकाळच्या घटना यांविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहास संशोधकांची मते आणि त्यांचे संदर्भ पुरावे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेचा विषय झाला आहे; पण वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय असा अचानकपणे मध्येच कसा येतो ?
अभिमानाने एकवटलेल्या हिंदूंमध्ये आपापसांतील संघर्ष चालू ठेवण्यासाठी त्यांच्यात वैचारिक गोंधळ निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून स्वतःला हवे तसे करण्यासाठी स्वतःचा मार्ग प्रशस्त करणार्यांकडे हिंदूंचे झालेले थोडेसेही दुर्लक्ष कसे हानी करणारे ठरू शकते, याचे हे डोळ्यांदेखत घडत असलेले उदाहरण आहे.
हिंदूंना विचलित करण्याचे डावपेच
इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी प्रामाणिक राहिलेल्या वाघ्या कुत्र्याचे अस्तित्व आणि पुरावे असतील किंवा नसतील, हे वादाचे सूत्र नाहीच, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. राहिला प्रश्न वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या जागेचा, तर काही तार्किक सूत्रांवर हिंदूंनी नक्कीच विचार करावा. ‘वाघ्या कुत्र्याच्या समाधीमुळे शिवाजी महाराजांचा अवमान होतो’, असे म्हटले जात आहे; पण ज्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज लढले, त्या औरंग्याच्या कबरीला दिल्या जाणार्या खैरातीमुळे शिवरायांचा अवमान होत आहे, त्याचे काय ? वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी दिलेली छोटीशी जागा औरंग्याच्या कबरीपेक्षा अधिक टोचणारी कशी काय ? प्रतापगडावरील अफजलखानाची कबर, विशाळगडावर इस्लामी अतिक्रमणे काहीच अडचण निर्माण करत नाहीत. विशाळगडावर छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिकाबाई यांच्या समाधीसमोर दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच अडचणीचा नाही; विशाळगडावर बाजीप्रभु आणि फुलाजी प्रभु देशपांडे यांनी छत्रपतींसाठी स्वतःचे प्राण त्यागले, त्यांच्या समाधीवर छप्पर नाही; याच विशाळगडावर आदिलशाहीचा सेनापती मलिक रेहानचा दर्गा दिमाखात उभा आहे, जो विशाळगडापेक्षा अधिक ‘पर्यटक’ खेचत आहे, त्याची कुणाला अडचण नाही; पण रायगडावर असलेली प्रामाणिक वाघ्या कुत्र्याची समाधी अडचणीची कशी काय ठरते ?
वाघ्या कुत्र्याच्या इतिहासातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करून त्याद्वारे हिंदूंमध्ये दुफळी निर्माण केली जात आहे, हे सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या हिंदूंच्या नक्कीच लक्षात आले असेल.
‘सामूहिक भ्रमिष्टपणा’ निर्माण करण्याचा प्रयत्न
मानसशास्त्रातील ‘मास सायकॉसिस’ म्हणजे ‘सामूहिक भ्रमिष्टपणा’ या संकल्पनेचा वापर करत योग्य वाटेने चालणार्या हिंदूंमध्ये वैचारिक गोंधळ निर्माण करून त्यांची वाट चुकवण्याची ही खोड आहे. ‘मास सायकॉसिस’चा वापर करून स्वतःचा हेतू साध्य करण्याची चलाखी किती सहजपणे वापरली जात आहे, हे लगेच कळून येत नाही. खरेतर जागृत हिंदूंच्या गतीला रोखण्यासाठी त्यांना वैचारिक गोंधळाला बळी पाडण्याविना दुसरे कुठलेही माध्यम आता डाव्यांच्या हातात राहिलेले नाही. त्यामुळे विझणार्या आगीची ही शेवटची फडफड म्हणता येईल. त्यामुळेच पू. भिडेगुरुजी विरुद्ध छत्रपती संभाजी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे वाद चालू केले जातात. हिंदवी स्वराज्य आणि मोगल यांच्यातील ऐतिहासिक तथ्यांना बाजूला सारून नवे वाद उत्पन्न करत हिंदूंचे लक्ष विचलित करण्याचा हा डाव लक्षात घ्यायला हवा.
उद्ध्वस्त झाली पाहिजे औरंग्याची कबर, वाघ्याची समाधी नाही !

स्वामी विवेकानंदांनी तेव्हाच्या नेत्यांना उद्देशून म्हटले होते, ‘तुम्हाला समाजकल्याणाचा मार्ग स्वीकारायचा असेल, तर स्वतःचा स्वार्थ, समस्या बासनात गुंडाळून ठेवा.’ आताच्या पुढार्यांनी मात्र स्वार्थांधता, सत्तापिसासू, कुटीलता, षड्यंत्रकारी या विशेषणांना शोभेल, असे वर्तन करत स्वतःचा विवेकच बासनात गुंडाळून ठेवला आहे आणि हिंदूंमध्ये भ्रम निर्माण करून स्वतःचा अंतस्थ स्वार्थी हेतू ते साध्य करतांना दिसत आहेत. आतापर्यंत ते त्यांचा उद्देश साध्य करण्यात यशस्वी झाले असले, तरी त्यांचे पितळ आता उघडे पडले आहे. हिंदुत्वनिष्ठ सरकारांनी इतिहासाची खरी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. असे असले, तरी ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला’, हे लक्षात घेऊन इतिहासात दुरुस्ती करतांना त्याची मोडतोड आणि भ्रम ज्यांनी निर्माण केला अन् करत आहेत, अशांना वेळीच शिक्षा केली, तरच भारताच्या गौरवशाली इतिहासातून उद्याचा उज्ज्वल भारत घडून शकेल.
‘औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवरायांचे शौर्याचे द्योतक आहे’, असे सांगून तिला वाचवण्याचा प्रयत्न मोगलांच्या वंशजांनी चालवला आहे; पण जागृत हिंदू त्याला बधणार नाहीत, हे लक्षात आल्याने वाघ्या कुत्र्याच्या समाधीकडे विषय वळवला गेला आणि त्यावर आक्षेप घेतला गेला. शिवरायांचे आताचे मावळे मोगलांच्या वंशजांना पुरून उरतील आणि या षड्यंत्राला ते नक्कीच भुलणार नाहीत, तसेच आक्रमकांच्या स्मृतींना कायमचे नष्ट करण्यासाठी वैध मार्गाने योग्य पावले उचलतील, हेही निश्चित ! कारण छत्रपती संभाजी महाराज जसे औरंग्याच्या आमिषांना बळी पडले नाहीत, तसेच जागृत आणि संघटित हिंदू या बुद्धीभेदाला, वैचारिक गोंधळाला बळी पडून त्यांची वाट चुकणार नाहीत; म्हणूनच ‘नॅरेटिव्ह माइंडेड’ लोकांनी त्यांच्या ‘नॅरो’ (संकुचित) बुद्धीच्या मर्यादा लक्षात घ्यायला हरकत नाही. ‘भ्रमिष्ट व्हायचे कि धर्माच्या आधारे योग्य कृती करायची ?’, याची हिंदूंना काही अंशी जाणीव व्हायला लागली आहे. त्यामुळेच वाटेवरील फाट्यांना न भुलता सत्य आणि गौरवशाली ध्येयापर्यंत मार्गक्रमण करत रहाणे, हेच हिंदूंच्या हिताचे आहे.
हिंदुद्वेष्ट्यांच्या षड्यंत्राला बळी न पडता हिंदूंनी गौरवशाली वाटेवर मार्गक्रमण करत रहावे ! |